मुंबई । Mumbai
बीडमधील सरपंच प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच पेटलंय. विरोधक आक्रमक झाले असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे.
या हत्येप्रकरणी राज्यातील विरोधकांनी बीडमधील वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला असून विरोधक एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बीड आणि परभणी दौरा करणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात अनेकजण सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत. अशात जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.