
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अवैध व्यावसायिकांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम राबवत संगमनेर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन दिवसांत सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये गोमांस, मावा, जुगार आणि अवैध दारूविक्रीप्रकरणी एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 लाख 43 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती संकलित करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डीले, जालिंदर साखरे, आजिनाथ पाखरे, सोमनाथ झांबरे, मनोज साखरे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, शामसुंदर जाधव आणि किशोर शिरसाठ यांचा समावेश होता. पथकांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
यानुसार 6 आणि 7 ऑगस्ट 2026 रोजी पथकांनी संगमनेर शहर, कर्जत आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. संगमनेर शहर हद्दीत गोमांस विक्रीविरोधात दोन कारवाया करण्यात आल्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारविरोधात तीन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. तसेच अवैध दारूविक्रीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत 33 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केलेल्या सात स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 3 लाख 43 हजार 280 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




