Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai BEST Election : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव; बाजीगर ठरलेल्या शशांक...

Mumbai BEST Election : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव; बाजीगर ठरलेल्या शशांक राव यांनी मानले फडणवीस, शेलारांचे आभार

उद्धव-राज ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

मुंबई | Mumbai

दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (Mumbai BEST Election) निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. या निवडणुकीतील २१ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळवत शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनेलने घवघवीत यश मिळवले. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागांवर यश मिळाले आहे. मात्र,या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयानंतर शशांक राव यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानत ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शशांक राव म्हणाले की, “कोणीही एकत्र आले, पण कामगार क्षेत्रात कामगारांचे हित पाहिले नाही, तर त्यांना असेच भोपळे मिळणार. आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. १९४६ पासून आमची संघटना आहे. यामध्ये अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस या संघटनेचे अध्यक्ष होते, शरद राव (Sharad Rao) या संघटनेचे सरचिटणीस होते. आमची संघटना कामगारांसाठी काम करते. मी भाजपमध्ये (BJP) असल्याने त्या पक्षाचा विचार मानतो. कामगार संघटनांचा हेतू एकच असतो, ते कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतात. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतो”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “दोन भाऊ एकत्र आले हा प्रश्न नाही, जर तुम्ही कामगारांसाठी काम केले, तर एकटे असाल तरी निवडून येता, हे कामगारांनी दाखवून दिले आहे. इतक्या वर्षांच्या लढाईत नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अगदी विरोधी पक्षनेते असतानाही मदत करत, आशिष शेलार (Aashish Shelar) यांनीही नेहमीच बेस्ट कामगारांना मदत केली आहे, आम्ही निवडणुकीचा प्रचार उशिरा सुरु केला. कामगारांना निवृत्तीनंतर तीन वर्ष ग्रॅच्युईटी मिळाली नाही. त्यासाठी आझाद मैदानात मोठा मोर्चा होता, त्यावेळीही शेलारांनी कामगारांना मदत केली. त्याची ही पोचपावती आहे. ब्रँड अनेक असतील, पण जो कामगार, जनतेचे काम करेल तोच टिकेल”, असा इशारा शशांक राव यांनी दिला.

कोण आहेत शशांक राव?

शशांक राव हे मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत. शशांक राव हे कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे चिरंजीव आहेत. आठ वर्षांपूर्वी शशांक राव यांनी त्यांच्या पदार्पणातच मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्व करत ते यशस्वी केले होते. शरद राव यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या राव यांनी बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात महत्त्वाची भूमिका बजावली. शशांक राव यांचा काम करण्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. आजवर अनेक आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे त्यांच्या आजचा विजयाचे यश मानले जात आहे. शशांक राव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मविआ-महायुतीचे उमेदवार जाहीर;...

0
मुबंई |Mumbai विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची...