अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नेप्ती टोलनाका परिसरात ट्रक चालकाला जुगाराच्या बहाण्याने धमकावून 55 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार अज्ञात इसमांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजकुमार मस्तराम यादव (वय 28, रा. सुलताना, उत्तर प्रदेश) यांनी मंगळवारी (9 जून) फिर्याद दिली आहे. ते विघ्नहर्ता ट्रान्सपोर्ट, बारामती येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते 3 जून रोजी छत्तीसगडमधील भाटापारा येथून माल घेऊन पुण्याकडे निघाले होते. दरम्यान, 5 जून रोजी त्यांचा ट्रकनेप्ती टोलनाका परिसरात खराब झाल्याने तेथेच थांबला होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यादव हे टोलनाक्याजवळील चहाच्या दुकानात गेले असता तेथे चार इसम जुगार खेळत होते.
संबंधित इसमांनी यादव यांना तुम्ही दोन हजार रूपये जिंकले आहात असे सांगत त्यांच्या हातात पैसे दिल्यासारखे करून पुन्हा ते परत घेतले. त्यानंतर त्यांनी एकमेकांमध्ये बोलत यादव यांच्या नावावर 15 हजार रूपयांची पैज लावल्याचे सांगितले आणि ते पैसे हरल्याचे भासवून त्यांच्याकडे रकमेची मागणी सुरू केली. यादव यांनी आपण जुगार खेळलो नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला. मात्र, संबंधित इसमांनी त्यांचा मोबाईल फोन ताब्यात घेतला. तसेच त्यांच्याकडील सहा हजार रूपये रोख रक्कम घेतली.
यानंतर मोबाईलव्दारे ऑनलाइन व्यवहार करून आणखी नऊ हजार रूपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले, यादव यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून केडगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेजवळील एटीएममध्ये नेले. तेथे यादव यांच्या पत्नी बिंदू यादव यांच्या कॅनरा बँक खात्याशी संबंधित एटीएम कार्डव्दारे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे चार व्यवहार करून एकूण 40 हजार रूपये काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.




