अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या भाकरे टोळीविरूध्द पोलिसांनी संघटित गुन्हेगारीच्या कलमान्वये कारवाई केली आहे. या टोळीतील प्रेम नरेंद्र भाकरे, यश सुनील घाग आणि विशाल भाऊसाहेब पाटोळे या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांचे दोन साथीदार पसार आहेत. या टोळीतील सदस्यांविरूध्द जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि जबरी मारहाण यांसारखे एकूण 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
28 सप्टेंबर 2026 रोजी रात्री अकराच्या सुमारास अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला काही जण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. तिघांना पकडले तर त्यांचे साथीदार अभिषेक ऊर्फ भोर्या अरविंद भिंगारदिवे आणि संग्राम सोन्याबापू कदम हे पळून गेले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि लाल मिरचीची पूड यांसारखे साहित्य आढळून आले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित आरोपींविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने एमआयडीसी पोलिसांनी संबंधित गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 111 वाढीव स्वरूपात लागू करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित गुन्ह्यात कलम 111 वाढविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राकेश खेडकर, शैलेश रोहोकले, राजु सुद्रीक, दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे आदींचा पथकाने या कारवाईत मदत केली.
जबरी चोरी करणारा संशयित जेरबंद
साईबन परिसरात मैत्रिणीसोबत बसलेल्या युवकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जबरी चोरी करणार्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. अक्षय भीमराव मोरे (वय 24, मूळ रा. सिंधफना वडळी, ता. शिरूर कासार, जि. बीड, हल्ली रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू तसेच चोरीस गेलेला मोबाईल, रोख रक्कम आणि पाकीट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



