Sunday, September 6, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा, मुळा पाणलोटात पुनर्वसु सरींचे तांडव

Bhandardara : भंडारदरा, मुळा पाणलोटात पुनर्वसु सरींचे तांडव

भंडारदरा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

वाकी ओव्हरफ्लो, निळवंडेत आवक वाढली

- Advertisement -

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुर्नवसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 4532 दलघफू (41 टक्के) झाला होता. धो धो पडणारा पाऊस आणि होणारी विक्रमी आवक यामुळे आज काही तासांतच हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव काल सोमवारी 5 वाजता ओव्हरफ्लो झाला. 789 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णवंती नदी वाहती झाली असून हे पाणी निळवंडेत दाखल होत आहे. परिणामी या धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. भंडारदरा धरण पाणलोटात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर तुफान वाढला होता. त्यामुळे डोंगरदर्‍यांमधील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. भंडारदरा धरण आणि पाणलोट क्षेत्र धुक्याने लेपाटून गेले आहे. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. ओढे नाल्यांना पूर आला असून धरणात विसावत असल्याने आता तासागणिक भंडारदर्‍याचे पोट फुगू लागले आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 3608 दलघफू होता. त्यात काल सकाळपर्यंत 400 दलघफू पाणी वाढले. तो साठा 3899 दलघफूवर पोहचला. पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात काल दिवसभराच्या बारा तासांत विक्रमी 633 दलघफू पाणी जमा झाले. गत 24 तासांत तब्बल 1033 दलघफू पाणी नव्याने आले. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 4532 दलघफू झाला होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास आज मंगळवारी सायंकाळपर्यंत हे धरण निम्मे भरलेले असेल. निळवंडेतही प्रथमच आवक वाढली आहे.

8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 1667 दलघफू (20टक्के) पाणीसाठा झाला होता. आज या धरणात नवीन पाण्याची आवक वाढणार आहे. दरम्यान, धो-धो पाऊस कोसळत असल्याने झाडे पडली आहेत. काही घरांच्या कौलांचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला असून डोंगरदर्‍यात राहणारा आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तसेच पाणलोट क्षेत्र गारठून गेले आहे.

मुळा नदीला छोटा पूर विक्रमी आवक होणार

कोतूळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात धो धो पाऊस कोसळत असल्याने अकोलेतील मुळा नदीला छोटा पूर आला आहे. परिणामी मुळा धरणात आज विक्रमी नवीन पाण्याची आवक होणार असून 26000दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा उद्या 30 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुराचे पाणी कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिरात शिरले आहे. सुमारे तीन फूट पाणी होते. शनिवारी रात्री पावसाचा जोर असल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 2635 क्युसेक होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सायंकाळी हा विसर्ग 2053 पर्यंत खाली आला. पण त्यानंतर दुपारनंतर पावसाचा वेग पुन्हा काहीसा वाढल्याने मुळा नदीतील विसर्ग हळूहळू वाढत होता. काल रविवारी सकाळी 6260 क्युसेक होता. त्यानंतर पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात आद्रा नक्षत्राच्या सरींनी तांडव नृत्य सुरू केल्याने नदीला तासागणिक वाढ होत होती.

दुपारी 3 वाजात हा विसर्ग 18724 क्युसेक होता. त्यामुळे मुळा नदीला छोटा पूर आला होता. ही पाण्याची पातळी रात्री उशीरापर्यंत होती. त्यामुळे मुळा धरणात आज विक्रमी आवक होणार असल्याने या धरणातील पाणीसाठा उद्या 30 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अतीवृष्टीमुळे आदिवासी भागात भात खाचरे बांधांचे तसेच भात रोपांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी 6356 दलघफू (24.44टक्के) होता. सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा 6469 दलघफू झाला होता.

कुकडी प्रकल्पात 1731 दलघफू पाण्याची आवक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि औद्यागिकरणाचे भवितव्य अवलंबून असलेल्या कुकडी समूह धरणांच्या पाणलोटात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. काल सायंकाळी संपलेल्या 34 तासांत 1731 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे समूह धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 4780 दलघफू (16.11 टक्के) झाला आहे.

गत आठवडाभरात या प्रकल्पात एकूण 3692 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. गतवर्षी हा पाणीसाठा 12023 दलघफू (41 टक्के) होता.
कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण आहे. भंडारदरापेक्षाही अधिक साठवण क्षमता असलेल्या गत 24 तासांत डिंभेत 512 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हा या हंगामातील आवकेचा विक्रम आहे. एकूण पाणीसाठा 3276 दलघफू झाला असून उपयुक्त साठा 2276 दलघफू आहे. धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी अशी- येडगाव 33 टक्के, माणिकोह 13.84 टक्के, वडज 38.48 टक्के, डिंभे 18.22 टक्के, विसापूर 13.6 टक्के, चिल्हेवाडी 28.43 टक्के, पिंपळगाव जोगे आणि घोडेगाव धरणात नवीन पाणी येत असलेतरी या धरणांतील पाणीसाठा मायनस आहे. आठ दिवसांपूर्वी कुकडी प्रकल्पात अवघा 4 टक्के पाणी होते. पण आता पाच-सहा दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाल्याने पाण्याची आवक वाढली असल्याने साठा झपाट्याने वाढत आहे.

नाशिकला ढगफुटीचा इशारागोदावरीला पूर येण्याची शक्यता
हवामान खात्याकडून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी आज मंगळवारी (दि.7) ढगफुटी होण्याचा धोका असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदीर उद्यापर्यंत बंद राहणार आहे. सप्तशृंगी गड दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पहिने, ब्रम्हगिरी, दुगारवाडी, हरिहरगड, त्रिंगलवाडी आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. कोपरगाव, नेवाशातील नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विठुराया वारकर्‍यांना पावला!
विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी पायी दिंडीद्वारे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. गत आठवड्यात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परिणामी प्रशासन आणि दिंडी, पालखी चालक चिंतेत पडले होते. लाखो वारकर्‍यांना पाणी कसे पुरविणार असा प्रश्न सतावत होता. पण गत पाचसहा दिवसांपासून नूर बदलला असून राज्यात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे वारकरी सुखावला असून प्रशासनानेही सुटकचा निःश्वास सोडला आहे. चंद्रभागेलाही पाणी आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

भंडारदरा, मुळा पाणलोटातही पर्यटकांना बंदी

भंडारदरा (वार्ताहर) – भंडारदरा आणि मुळा पाणलोटात धो-धो पाऊस कोसळत आहे. पुढच्या काळातही इशारा देण्यात आला आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे सांदनदरी, कोकणकडा, रतनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, कळसूबाई शिखर, रिव्हर्स फॉलसह इतर वॉटर फॉल तसेच इतर साहसी खेळात पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महसूल व वनविभागाने काल जारी केला आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...