भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण आज 75 टक्के भरणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीय वार्यांची स्थिती आणि तिथून थेट अरबी समुद्रापर्यंत पसरलेला द्रोणीय पट्टा यामुळे मान्सून अत्यंत सक्रिय झाला आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकणकडा, सह्याद्रीच्या रांगा आणि घाट माथ्यावर आषाढ सरी जोरदार कोसळू लागल्या आहेत.
गत चार पाच दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात मान्सून सक्रिय असून सोमवार पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे काल मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत 344 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7434 दलघफू (67.34 टक्के) झाला होता. पाऊस कोसळत असल्याने आणि पाणी येत असल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठा 7625 (69.07 टक्के) झाला होता. सायंकाळनंतर आषाढ सरींचे तांडव नृत्य सुरू केल्याने डोंगरदर्यांवरील धबधबे पुन्हा जोमाने वाहु लागले असून ओढेनाले भरभरून धरणाच्या पोटात विसावू लागले आहेत.
जोरदार पाऊस बरसत असल्याने आज बुधवारी पाण्याची विक्रमी आवक होण्याची शक्यता असून या धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, भातखाचरे पाण्याने तुडुंब होत असून निसर्ग सौंदर्याने आणखी फुलला आहे. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दीही दिवसेंदिवस वाढु लागली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो 197 क्युसेकपर्यंत पुन्हा वाढला असून निळवंडेतही धिम्या गतीने आवक होत असून या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3036 दलघफू वर गेला होता. लवकरच या धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर जाणार आहे.
मुळातील साठा 11000 दलघफूच्या पुढे
कोतूळ वार्ताहराने कळविले की, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग वाढत आहे. काल सायंकाळी येथील मुळेचा विसर्ग 3212 क्युसेक होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 10935 दलघफू झाला होता. आज हा साठा 11000 दलघफूच्या पुढे गेलेला असेल.




