भंडारदरा (वार्ताहर)
उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग-व्यवसायास वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक वाढली आहे.
घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस कोसळत असल्याने ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नव्याने ११९ दलघफू पाणी दाखल झाले. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास काही तासांतच या धरणातील पाणीसाठा २५ टक्के पोहचणार आहे.
कोतूळ येथील प्रतिनिधीने कळविले की, दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल सोमवारी दुपारपासून पुन्हा बरसण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणलोटात शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै उजेडला तरी पाणलोटात पाऊस नसल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.
गत आठवड्यात दोन दिवस पाऊस चांगला झाला. त्यामुळे मुळा नदीच्या उगमस्थानी असलेले आंबित धरण ओव्हफ्लो झाले. त्यानंतर आता मुळा नदी वाहती असून हे पाणी कोतूळ जवळील पिंपळगाव खांड धरणात जमा होत आहे. त्यामुळे ६०० दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे, डोंगरदऱ्या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे सक्रिय झाले असून शेतांमध्ये पाणी दिसू लागले आहे.
दरम्यान आढळा धरण पाणलोटातही पावसाची रिपरिप सुरू असलीतरी धरणात नव्याने पाण्याची फारशी आवक नाही. निळवंडे धरणातही आवक झालेली नाही.




