भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara
नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून शुक्रवारच्या तुलनेत पावसाचा जोर आणखी वाढला होता. त्यामुळे धरणाकडे येणारी आवकही वाढली आहे. त्यामुळे हे धरण आज-उद्या दिवसांत 65 टक्के भरणार आहे. त्यामुळे डोंगरदर्यांवरील धबधबे फेसाळू लागलेे असून ओढेनाले पाण्याने खळखळू लागले आहेत.
काल दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री 8 वाजेनंतर पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत होता. काल शनिवारी सकाळपर्यंत घाटघरला 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 6921 दलघफू (62.69 टक्के) झाला होता. निळवंडेत 2935 दलघफू (35.22 टक्के) साठा आहे. आढळा धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी काहीसा पाऊस वाढला होता. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 10587 दलघफू (40.71 टक्के) पाणीसाठा झाला होता. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने भातखाचरे पाण्याने तुडूंब होत आहे. परिणामी भात लागवडीला वेग आला आहे.




