आज विक्रमी पाण्याची आवक होणार
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
सह्याद्री घाटमाथ्यावर आषाढ सरींचे तांडव सुरूच असल्याने धरणांत नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता 7914 दलघफू (71.69 टक्के) तर निळवंडेचा 6169 दलघफू (74.32 टक्के) झाला आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने जलसंपदा विभागाने जलाशय परिचलन सूचीनुसार 8331 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. या धरणातून काल रविवारी राञी 11 वाजता 800 क्युसेस पर्यंत विसर्ग वाढविला होता.
पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास निळवंडेतून प्रवरा नदीत कोणत्याही क्षणी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक वाढल्याने दोन्हीही धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे पाणलोटातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिसर गारठून गेला आहे.
धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचे आगार म्हणून ओळख
असलेल्या घाटघर, रतनवाडी, पांजरे, भंडारदरा येथे धो धो आषाढ सरी कोसळत असल्याने डोंगरदर्यांवरुन पाणी खळाळत येऊन धरणामध्ये विसावत आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत (रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात 701 दलघफू तर निळवंडेत 775 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे.या स्थितीमुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आढळा धरण भरल्याने नदीमध्ये 277 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने आढळा नदी प्रवाही झाली आहे.
विसर्ग (क्युसेकमध्ये)
भंडारदरा 8331, निळवंडे 800, मुळा 13375, गोदावरी 39172, आढळा 277
24 तासांत पडलेला पाऊस (आकडे मिमीमध्ये)
भंडारदरा 72, घाटघर 92, रतनवाडी 98, निळवंडे 28, पांजरे 73, वाकी 58, आढळा 05, अकोले 18
पाणी वाढल्याने गोदावरी नदीकाठी सतर्कतेचा इशारा
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सलग दुसर्या दिवशी सुरू असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे धरणांचे विसर्ग वाढल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल 39172 क्युसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी वाहू लागल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून दारणा धरणाच्या पाणलोटात घोटी, इगतपुरी परिसरात संततधार सुरू आहे, त्यामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होत आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासांत दारणा धरणात 825 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणा समूहातील भावलीतून 1218 क्यूसेक, भाम मधून 5283 क्यूसेक, वाकीतून 1041 क्यूसेकने विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने सुरू आहे. तसेच घोटी, इगतपुरीच्या घाटमाथ्यावरील पाणी नव्याने दाखल होत असल्याने दारणा धरणातून करण्यात येणार्या विसर्गात वाढ होत आहे.
काल सकाळी सहा वाजता 7914 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग काल सायंकाळपर्यंत 9932 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. दारणा नदीतून हे पाणी नांदूर मधमेश्वर बंधार्याच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. काल सकाळपर्यंत या धरणातून 5.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मार्गात वालदेवी 65 क्यूसेक, आळंदीतून 243 क्यूसेक, मुकणेतून 400 क्यूसेक वेगाने विसर्ग सामावत आहे.
काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासांत दारणा धरणाच्या पाणलोटात इगतपुरी 90, घोटी येथे 61, भावलीला 129, भाम 90, वाकी 61 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोटात आंबोली येथे 166, त्र्यंबक येथे 70, कश्यपीला 80, गौतमीला 77 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर समूहातील कश्यपी धरणातून 500 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणात 24 तासांत अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणातून काल सायंकाळी 5186 क्यूसेकने विसर्ग गोदावरीत सुरू होता. काल सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 3.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी 6 या 12 तासांत गंगापूरच्या पाणलोटातील आंबोली येथे 157 मिमी पावसाची नोंद झाली.
त्र्यंबकला 89, गंगापूरला 23, गौतमीला 60, कश्यपीला 22 मिमी पावसाची नोंद झाली. 12 तासांत गंगापूर धरणात 270 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. गंगापूरमध्ये 60.42 टक्के पाणी साठा आहे. पालखेड धरणातूनही 646 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. वरील सर्व धरणांचे पाणी खाली नंदुरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत असल्याने नंदुरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 39172 क्यूसेकने विसर्ग झेपावत आहे. या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र तुडूंब भरून वाहत आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 18 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
जायकवाडीत उपयुक्त साठा 50 टक्क्यांच्या पुढे
काल सायंकाळी जायकवाडीत उपयुक्त साठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. उपयुक्त साठा 37.7 टीएमसी इतका झाला आहे. तर मृतसाठ्यासह एकूण साठा 64.8 टीएमसी इतका झाला आहे. काल सायंकाळी जायकवाडीत गोदावरीतून 16296 क्यूसेकने नवीन पाणी दाखल होत होते. गोदावरीतील वाढलेला विसर्ग पाहता जायकवाडी जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ होणार आहे.
मुळात 13 हजार 375 क्यूसेसने आवक
राहुरी, कोतुळ |प्रतिनिधी| Rahuri
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक चांगली सुरू झाली आहे. मुळा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 16 हजार 61 दशलक्ष घनफूट झाला असून कोतूळ कडून 13 हजार 375 क्यूसेसने आवक सुरू होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने जवळपास 62 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे.
मुळा धरण पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कोथळा, कोहने, कोतुळ परिसरात संततधार पावसाचे सातत्य टिकून आहे. जोरदार आषाढी कोसळत असल्याने मुळा परिसरातील जनजीवन गारठले. सततच्या पावसाने भात रोपांची प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या 15 मे पासून आदिवासी भागात पाऊस पडत असल्याने भात लागवडीसाठी टाकलेली रोपे सडून गेली आहेत. यामुळे शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. भात लागवडी कशा कराव्यात असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.जीे थोडीफार रोपे वाचली आहेत ती रोपे पिवळी पडली आहेत.
भात रोपे पिवळी पडल्याने लागवडीयोग्य राहिली नाहीत.तालुक्यात पुरेसा युरिया खते उपलबद्ध नसल्याने शेतकरी पिवळी रोपे वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. आदिवासी भागात शेतकर्यांचे भात रोपे वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. घाटघर, भंडारदरा परिसरातील तसेच आंबित, पाचनई या भागात भात रोपांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांनां शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआयचे भंडारदरा विभाग प्रमुख रघुनाथ सोनवणे यांनी केली आहे. पावसाचे सातत्याने मुळा नदी पात्रातून काल रविवारी सकाळी 10342 क्युसेसचा विसर्ग मुळा धरणाकडे सुरू होता. तर सायंकाळी त्यात वाढ होऊन 13375 क्युसेसने विसर्ग सुरु होता. आज अखेर मुळा धरणात 7176 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणी साठ्याने 16 टीएमसी चा टप्पा ओलांडला आहे.
डिंभे 60 टक्के भरले घोडमधून विसर्ग वाढला
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दक्षिण नगर जिल्ह्याला लाभदायक असलेल्या कुकडी धरण पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने समूह धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. या समूहातील सर्वात मोठे डिंभे धरण. याची एकूण पाणी साठवण क्षमता 13.5 टीएमसी आहे. सध्या धरणात 7.1 टीएमसी पाणीसाठा आहे, जो क्षमतेच्या 60% पेक्षा जास्त आहे.
दरम्यान, घोड धरण 82 टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून नदीत विसर्ग वाढविण्यात आला आहे. विसापूर धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणात 97 टक्के पाणीसाठा आहे. येडगाव धरणही 86 टक्के भरले आहे. या समूह धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहचला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणी आहे. अजूनही पाऊस कोसळत असल्याने सर्वच धरणांमध्ये आवक वाढली आहे.





