मुंबई । Mumbai
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
त्यात राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला होता. अशातच आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.
भास्कर जाधव म्हणाले, माझी राजकारणातील सुरुवात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मला भाषणं करायीच संधी मिळाली. त्यावेळच्या शिबिरांत मला भाषणं करण्याची संधी मिळायची. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या पोराला महाराष्ट्रात फिरवा, याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील, तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले.
महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं मला सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.
याचदरम्यान, उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांचं कौतुक केले, त्यानंतर दुसऱ्याच तासांत भास्कर जाधवांची प्रतिक्रिया समोर आली, त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ नेते आहेत. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होईल. ते आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केला नाही, हे पक्षाचे दुर्दैव आहे, असे विधान करत उदय सामंत यांनी राजकीय चर्चेला सुरूवात केली. सामंत यांच्या विधानानंतर भास्कर जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार का? या राजकीय चर्चेने जोर धरला आहे.