अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरी क्षेत्र अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागरदेवळेशी संलग्न आहे. अहिल्यानगर शहराशी भिंगारची भौगोलिक सलगता नाही. त्यामुळे भिंगार महापालिका हद्दीत समाविष्ट करणे योग्य नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेत भिंगारमधील सुमारे 131 एकर नागरी क्षेत्र वर्ग करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेची मंजुरी अपेक्षित असल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये महासभेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. तत्कालीन प्रशासकांनी प्रस्ताव सविस्तर माहितीसह फेरसादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 31 डिसेंबर रोजी नगररचना विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, आयुक्त यशवंत डांगे यांनी यावर निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी आयुक्त डांगे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणे योग्य असणार नाही, असा निर्णय आयुक्त डांगे यांनी घेतला आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाकडून भिंगारचा महापालिकेत समावेश करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात महानगरपालिकेकडे प्रस्ताव होता. त्यावर चर्चा करून माहिती घेण्यात आली. भिंगार शहर हे भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर शहराशी संलग्न नाही. भिंगारची भौगोलिक सलगता नागरदेवळे गावाशी आहे. त्यामुळे भिंगार महापालिकेत समाविष्ट करणे योग्य नाही, अशा निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत. राज्य शासनाला हा निर्णय कळवण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.