नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक परिक्षेत्रात मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबवले. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या महत्त्वपूर्ण इनपुट्सनंतर नाशिक शहर, मालेगाव, जळगाव, पालघर, अकोला आणि अहिल्यानगरसह राज्यात तब्बल ४० हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या नाशिक भागातून (Old Nashik Area) एटीएसने दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून, तिसरा संशयित पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्यांना मुंबई एटीएसच्या स्वाधीन केले जाणार आहे. छापासत्रात लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
गँगस्टर शहजाद भट्टी सध्या दुबईतून (Dubai) आपले रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो भारतीय तरुणांना चिथावणी देऊन देशविरोधी कारवायांसाठी भडकवत असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. या सिंडिकेटमध्ये राज्यातील एकूण ५७ जणांची ओळख पटली असून, त्यापैकी ४७ जणांची प्रत्यक्ष चौकशी केली जात आहे.
नाशिक परिक्षेत्रात हायअलर्ट
या कारवाईचे स्वरूप अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. नाशिक आणि मालेगावमधील काही तरुण भट्टीच्या सिंडिकेटशी डिजिटल माध्यमातून जोडले गेल्याचा दाट संशय असल्याने या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एटीएसच्या या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोण आहे शहजाद भट्टी?
शहजाद भट्टी हा मूळचा लाहोरचा असून गेल्या काही वर्षांपासून तो दुबईतून आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत आहे. त्याचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असून, भारतातील तरुणांना चिथावणी देऊन त्यांना बेकायदेशीर कृत्यांमध्ये ओढणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.




