भिवंडी | Bhiwandi
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) शहरातील नारपोली गंगाराम वाडी (Narpoli Gangaramvadi) परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. चार मजली निवासी इमारत (Building Collapsed) कोहिनुर कोसळल्याने आतापर्यंत ९ जणांचा (9 Death) मृत्यू झाला तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून २ ते ३ अडकल्याची माहिती मिळत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भिवंडी अग्निशमन दल, आपातकालीन व्यवस्था तसेच पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (30 जुलै) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता अरुंद असल्या कारणाने बचावकार्य सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून ही इमारत आधीच धोकादायक इमारतीच्या क वर्गात असल्याचे घोषित केले होते. या इमारतीमधून काहीजण समान काढण्यास गेल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
आज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा
भिवंडी येथील नारपोली भागातील गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर या चार मजली इमारतीचा काही भाग पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. गुरुवारी (30 जुलै) मध्यरात्री 11.30 ते 12 वाजतादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १० ते १२ जण अडकले, त्यांच्यापैकी नऊ मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट असून एका अपार्टमेंटमध्ये 15 अशा एकूण 30 खोल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम कमकुवत असल्याने ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत होती. गुरुवारी, या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात होती. या दुरुस्तीच्या कामामुळे संध्याकाळी 6 नंतर इमारतीला तडे जाण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे, रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इमारत झुकत असल्याची माहिती मिळताच पालिका प्रभाग समिती 4 चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी ही इमारत निर्मनुष्य केली. पण, तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू होते. तेव्हा त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील काही सदस्य आपले साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये गेले होते. त्याचवेळी इमारत कोसळली आणि आतमध्ये गेलेले लोकं ढिगाऱ्याखाली अडकले.




