Monday, April 27, 2026
HomeनगरAhilyanagar : भोंदूबाबा खरातवर शिर्डी पोलिसांचा होता गुप्त ‘वॉच’

Ahilyanagar : भोंदूबाबा खरातवर शिर्डी पोलिसांचा होता गुप्त ‘वॉच’

आठ दिवस चार पोलिसांनी दोन शिफ्टमध्ये ठेवले हालचालींवर लक्ष || नीरज जाधव व साथीदारांच्या मदतीने उघडकीस आला काळा कारभार

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिर्डी पोलिसांनी केलेली गुप्त कारवाई निर्णायक ठरली आहे. परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अशोक खरातवर तब्बल आठ दिवस साध्या वेशातील पोलिसांनी ‘वॉच’ ठेवत त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले. याच काळात त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती व पुरावे पुरवून खरातचा काळा कारभार उघडकीस आणण्यात निर्णायक भूमिका बजावली.

- Advertisement -

खरातच्या विरोधातील गंभीर माहिती नीरज जाधवकडे असल्याचे लक्षात येताच खरातने शिर्डीतील एका तरूणीच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नीरजविरोधात गुन्हा दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात संशय निर्माण झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी गोपनीय तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी अत्यंत गुप्तपणे तपासाची सूत्रे हाती घेतली. नीरज जाधवशी संपर्क साधून त्याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि त्याच्याकडून त्याच्या दोन मित्रांमार्फत पोलिसांपर्यंत आलेल्या पेनड्राईव्हमधील धक्कादायक पुराव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली.

दरम्यान, 7 मार्च ते 14 मार्च या कालावधीत शिर्डी पोलिसांच्या चार कर्मचार्‍यांनी दोन शिफ्टमध्ये खरातच्या बंगल्याबाहेर साध्या वेशात तैनात राहून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. कोण भेटते, कोणती वाहने ये-जा करतात, तो कधी बाहेर पडतो, कुठे जातो याची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. विशेष वाहनाव्दारे त्याचा पाठलागही करण्यात येत होता. खरात परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच 9 मार्च रोजी त्याला शिर्डीतील गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आणि 10 मार्च रोजी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. यामुळे त्याचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन फसला.

या संपूर्ण कारवाईदरम्यान नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता शिर्डी पोलिसांनी स्वतंत्रपणे ऑपरेशन राबवले, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर खरात देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता अधिक होती. दरम्यान, या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून शिर्डी पोलिसांनी जमा केलेले सर्व पुरावे एसआयटी कडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी दाखवलेली गोपनीयता, नियोजन आणि धाडस यामुळेच भोंदूबाबा अशोक खरातचा पर्दाफाश शक्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.

नीरजच्या खूनाची भीती

नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि खरातच्या कारनाम्यांची कुणकुण शिर्डी पोलिसांना लागल्यानंतर, त्याच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील त्याच्या घरी भेट दिली. तेथे त्याच्या आईकडे चौकशी केली असता, त्याच्या आईने शिर्डी पोलिसांना सांगितले की नीरजची काहीच चूक नसून त्याला तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन जा, नाहीतर अशोक खरात त्याचा खून करू शकतो. अशोक खरातचे सर्व पुरावे त्याच्याकडे असल्याचे शिर्डी पोलिसांना समजल्यानंतर, पोलिसांनी नीरजशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवले. त्याच्याकडून आवश्यक ती माहिती मिळवली जात होती. त्याच्या दोन मित्रांकडूनही पोलिसांना माहिती मिळत होती, असे सूत्रांनी सांगितले.

महिला आयोगाचा दबाव झुगारला
शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार्‍या तरूणीकडे शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप करत राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांवर दबाव आणला. तरूणीला त्रास देऊ नका, नीरज जाधव याला पकडा, असे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्याच दरम्यान, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना आयोगापुढे सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र गलांडे हे हजर राहिले नाहीत; त्यांनी पोलीस उपनिरीक्षकांना तेथे पाठविले. सुनावणी दरम्यान, आयोगाने शिर्डी पोलिसांवर गंभीर आरोप करत त्यांना धारेवर धरले. मात्र उपनिरीक्षकांनी त्यांना उत्तर न देता सर्व ऐकून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik NDCC Bank News : कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली कोलमडली; शेतकरी जिल्हा...

0
नाशिक | विजय गिते | Nashik राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ 'अपेक्षेपोटी' जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे....