Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमAhilyanagar : भोंदूबाबाला 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

Ahilyanagar : भोंदूबाबाला 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

काळी जादू, पैशांचा पाऊस आणि खोट्या पूजेच्या नावाखाली अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

काळी जादू करून पैशांचा पाऊस पाडतो, घरावरील करणी दूर करतो तसेच आजार बरे करतो, असे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार तसेच तिच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करणार्‍या भोंदूबाबाला येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. भदाणे यांनी दोषी धरत 10 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय 42, रा. शिर्सुफळ, आटोळे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. फिर्यादी पीडिता व तिच्या कुटुंबीयांना ज्ञानदेव कांबळे याने स्वतःला देवऋषी असल्याचे भासवले होते. घरातील आजारपण, मेंढ्यांचा मृत्यू, करणी व जादूटोणा यांपासून मुक्ती मिळवून देतो, असा दावा करून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला. घरासमोर चेडे-गोटे ठेवले आहेत, तुमच्यावर करणी झाली आहे. त्यासाठी विशेष पूजा, होम-हवन आणि विधी करावे लागतील, असे सांगून कांबळे याने विविध अघोरी पूजा करण्यास भाग पाडले.

पीडिता सतत आजारी पडत असल्याने तिला बरे करण्यासाठी लग्नासारखा विधी करावा लागेल, असे कांबळे याने सांगितले. त्यासाठी त्याने आणि पीडितेच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घालून फोटो काढण्यात आले. हे फोटो पुढे देवीसमोर पूजेसाठी ठेवायचे असल्याचे सांगून त्याने पीडितेची दिशाभूल केली. त्याने स्वतःकडे पैशांचा पाऊस पाडण्याची विद्या असल्याचे सांगत पूजाविधीसाठी पीडितेच्या वडिलांकडून तब्बल पाच लाख 50 हजार रूपये उकळले. या माध्यमातून कांबळे याने आर्थिक शोषण व फसवणूक केल्याचे न्यायालयाने मान्य केले.

नोव्हेंबर 2020 मध्ये कांबळे याने पीडिता घरी एकटी असताना तिचा विनयभंग केला. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये रात्रीच्या वेळी एअरगनचा धाक दाखवत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पूजेसाठी काढलेल्या फोटोंचा गैरवापर करून कांबळे याने पीडितेला ब्लॅकमेल केले. तू माझी पत्नी आहेस, माझ्या घरी नांदायला ये; अन्यथा जादूटोणा करून तुमचे घर उध्दवस्त करीन, अशी धमकीही कांबळे याने दिली होती. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. एन. उगले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना अंमलदार अनिल रोकडे यांनी सहाय्य केले.

खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडिता, तिचे वडील, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल ढगे यांनी भक्कम युक्तिवाद केला. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटला चालविण्यात आला. त्यांना उपनिरीक्षक संजय चव्हाण तसेच पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आर. डी. आडसुळ यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...