
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात हा करार करण्यात आला. या करारामुळे किल्ल्याच्या संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विविध विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला 17 मार्च 2025 रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती. मात्र, भुईकोट किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्यासाठी लष्कराची अंतिम परवानगी आवश्यक होती. या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. आता महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार झाल्याने विकासकामांच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील पायाभूत सुविधांपर्यंत विविध विकासकामे केली जाणार आहेत. किल्ल्याच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे आकर्षण ठरणार्या कामांमध्ये बुरुज क्रमांक 1 ते 11 पर्यंत सुमारे 1370 मीटर लांबीचा नेचर वॉकवे प्रस्तावित आहे. किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारण्यात येणार असून, परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी सोलर स्ट्रीट लाईटिंग करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता.यासाठी त्यांचे सहकार्य मिळाले.पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असून, जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि अध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.
– डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री.




