Monday, June 8, 2026
Homeनाशिकइतिहासाचा साक्षीदार भुईकोट किल्ला

इतिहासाचा साक्षीदार भुईकोट किल्ला

लासलगाव | हारूण शेख | Lasalgaon

लासलगावच्या उत्तरेला आहिल्याबाई होळकरांची (Ahilyabai Holkar) उपराजधानी चांदवड तर दक्षिणेला सरदार विंचूरकरांचे संस्थान. सरदार विठ्ठल शिवदेव दाणी (विंचूरकर) मल्हारराव होळकर या दोन्ही सरदारांनी थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दित शौर्य गाजविले…

- Advertisement -

त्यामुळे बक्षिसरुपी मल्हारराव होळकरांना इंदौर, चांदवड व इतर सुभे मिळाले व सरदार विंचूरकरांना विंचूर गाव व इतर सुभा मिळाला. विंचूर-चांदवड हा मार्ग लासलगावातूनच जातो. याच मार्गाने पूर्वी सरदार विंचूरकर, मल्हारराव होळकर हे ये-जा करायचे.

लासलगाव (Lasalgaon) हा मधला पठारी भाग म्हणून या काळात व्यापारी दृष्टीने व लष्कराला हालचाली, कवायती करता याव्या म्हणून या ठिकाणी भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) बांधण्यात आला. आजही कांद्याच्या आगारात हा किल्ला ताठ मानेने उभा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या किल्ल्याची जहागिरी आपल्या जावयाला दिली. किल्ला भुईकोट असून त्याचा रुबाब बघून आपण थक्क होतो. लासलगावची जुनी वेस ओलांडून आत तो सापडतो. या किल्ल्याची कहाणी थक्क करणारी आहे. यशवंतराव हे एक साधारण शिपाई होते परंतू अहिल्यादेवींना शूर जावईच हवा होता.

यशवंतरावांची निवड स्वयंवरातून झाली. त्यांनी जावयाला निफाडचा वाडा, लासलगावचा किल्ला, जुन्नर आदी जहागिरी बहाल केली. यशवंतरावांच्या निधनानंतर त्यांचे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे या किल्ल्याचा कारभार आला. 1835 दरम्यान इंदूरच्या गादी सांभाळणार्‍या हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशांच्या सरदाराने बंड केले. होळकर महालात फणशांचे गारदी घुसले पण नियोजन फसल्याने हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्‍या राजाभाऊ फणसे यांचे हरीराव महाराजांचे वारसदार तुकोजीराव यांच्याशी झुंज झाली आणि यात ते मृत्यूमुखी पडले.

यामुळे या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे गणपतराव हे सैरभैर झाले. आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेवून आपल्यावर कारवाई करुन जप्ती आणतील या शंकेतून त्यांनी हा किल्ला एक जैन व्यापारी आब्बड यांना विकला. हा किल्ला अहिल्याबाईंनी आपले जावई सरदार यशवंतराव फणसे यांना कन्यादानात मुलखाची जहागिरीसह दिला. लासलगाव व निफाड प्रांताचे पाटीलकीचे दिले होते. सरदार फणसे घराण्याला यात्रेचा मान, कर वसूली, शिक्षा देणे असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात प्रदान करण्यात आले.

नंतर 1818 मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात पाटीलकीचे वतन वंश परंंपरागत फणसेंकडे आले. लासलगावचा व नाशिकचा पाटिलकीचा बिल्ला नाशिक कलेक्टरने 1937 ला दिला. नंतर भारत स्वतंत्र सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 1952 ला वंशपरंपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंचीही पाटीलकी रद्द झाली. आजही किल्ला खासगी मालकीत राहिला. त्याला भक्कम अशी तटबंदी आहे.

भले मोठे महाद्वार आहे. आतमध्ये आता सिमेंटची काही घरे उभी राहिली आहेत. जुन्या इमारती, आतले काही लाकडी, दगडी व विटांचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. आतमध्ये लाकडाचे सुंदर कोरीव काम केलेला फार मोठा दरवाजा आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा सुद्धा फार भक्कम आहे. आज जरी तो चहुबाजूंनी घरांनी वेढलेला असला तरी तो ऐतिहासिक शान शोभावा इतका सुस्थितीत आहे. व हाच किल्ला लासलगावची नव्हे आपल्या इतिहासाची शान आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जून २०२६ – ‘काहीही चालतं’ वृत्ती नष्ट करण्याची...

0
देशाची राजधानी दिल्ली आणि बिहारमधील मुझफ्फरपूर येथे लागलेल्या आगीच्या भीषण दुर्घटना अपघात म्हणून सोडून देता येणार्‍या नाहीत. या दोन्ही घटना आपल्या व्यवस्थेच्या बेजबाबदारपणावर, भ्रष्टाचारावर...