मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील पथकर वसुली अर्थात टोल नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा फास्ट-टॅगद्वारेच टोल भरावा लागणार आहे. फास्ट-टॅग शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून टोल भरायचा झाल्यास अथवा फास्ट -टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे टोल वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार असून टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात टोल वसुली करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा