नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये बराच काळ प्रलंबित असलेल्या शांतता करारावर सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री करण्यास मंजुरी दिल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले असून अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकेबंदी हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी दोन्ही देशांमधील १४ कलमी मसुदा कराराची घोषणा केली आहे. या करारानुसार, इराणवरील अमेरिकेची सागरी नाकेबंदी उठवली जाणार असून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग पुन्हा खुला होणार आहे. या ऐतिहासिक करारावर आगामी शुक्रवारी, म्हणजेच १९ जून रोजी अधिकृत स्वाक्षरी होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचे अभिनंदन. मी या माध्यमातून घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला देखील नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देतोय, असे ट्रम्प म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो त्या जगभरातील जहाजांनी त्यांची इंजिन सुरु करावी आणि तेलाचा पुरवठा सुरु होऊद्यात असे ट्रम्प म्हणाले.
कच्चा तेलाच्या किमती घसरल्या
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार असल्याची अपडेट येताच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर दणकन आदळले आहे. ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये 4 टक्क्यांची घट झाली. तर, US वेस्ट टेक्सास इंटरमीजिएटमध्ये 4.60 टक्क्यांची घसरण झाली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे संकेत मिळताच कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करारावर सहमती झाल्याची घोषणा करताच कच्चा तेलाचे दर आणखी घसरले. ब्रेंट क्रूड चा दर 4 टक्क्यांनी घसरले आणि 83 डॉलर प्रति बॅरलवर आले. दुसरीकडे WTI Crude चा दर 80 डॉलर प्रति बॅरलवर आला. Murban Crude चा दर देखील 83 डॉलर वर पोहोचला.
शहबाज शरीफ यांची पोस्ट
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करार झाला आहे. दोनही पक्षांनी सर्व मुद्यांवर, याशिवाय लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहबती दर्शवली. पश्चिम आशियातील संघर्षावर मार्ग काढण्याच्या अमेरिका आणि इराण यांच्यातील कटिबद्धतेसाठी सहकार्य करणाऱ्या इतर देशांचे आभार, असंही शहबाझ शरीफ म्हणाले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे १४ मुद्दे काय?
इराणच्या ‘मेहर’ या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या १४ कलमी मसुद्यातील प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत:
२४ अब्ज डॉलर्सची संपत्ती मुक्त होणार: इराणची अमेरिकेने गोठवलेली २४ अब्ज डॉलर्सची (Frozen Assets) संपत्ती असून, त्यातील निम्मी रक्कम मुख्य चर्चा सुरू होण्यापूर्वीच अमेरिका इराणला परत करणार आहे.
नाकेबंदी उठवणार: अमेरिकन नौदलाने इराणभोवती केलेली सागरी नाकेबंदी ३० दिवसांच्या आत पूर्णपणे हटवली जाईल.
तेल आणि पेट्रोकेमिकल्सवर सवलत: इराणच्या कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोकेमिकल्सच्या निर्यातीवर लादलेले कठोर निर्बंध तात्काळ स्थगित केले जातील.
३०० अब्ज डॉलर्सचा पुनर्रचना निधी: इराणच्या पायाभूत सुविधांच्या आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र देश मिळून किमान ३०० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देतील.
होर्मुझवर इराणचे नियंत्रण: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल आणि या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा पुन्हा एकदा इराणच्या नियंत्रणात दिली जाईल.
मिसाईल आणि प्रॉक्सी अजेंड्यातून बाद: इराणचा वादग्रस्त बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम आणि प्रादेशिक प्रॉक्सी (लष्करी गट) यांना दिलेला पाठिंबा, हे विषय अमेरिकेने मुख्य चर्चेच्या अजेंड्यातून पूर्णपणे बाद केले आहेत.
६० दिवसांची अंतिम मुदत: हा संपूर्ण करार पूर्णपणे लागू करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) मान्यता मिळवण्यासाठी केवळ ६० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
सर्व आघाड्यांवर युद्धबंदी
इराणच्या ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’च्या सचिवालयाने याबाबत अधिकृत आणि आक्रमक निवेदन जारी केले आहे. “इराणने अमेरिकन आणि जिओनिस्ट (इस्त्रायली) शत्रूवर आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. या कराराच्या अंमलबजावणीनुसार, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध आणि लष्करी कारवाया आज रात्रीपासूनच कायमच्या थांबतील,” असे इराणने स्पष्ट केले आहे. मात्र, अमेरिकेने या करारातील आपल्या अटी पूर्ण केल्याशिवाय पुढील चर्चा पुढे सरकणार नाही, असा इशाराही इराणने दिला आहे.




