Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : गुंडांची मजल अत्यावश्यक सेवेपर्यंत! ​उपनगरला हप्त्यासाठी वितरकाला मारहाण...

Nashik Crime News : गुंडांची मजल अत्यावश्यक सेवेपर्यंत! ​उपनगरला हप्त्यासाठी वितरकाला मारहाण करुन सिलिंडर पळवला

सात जणांविरुद्ध दरोडा, खंडणीचा गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीतील झोपडपट्टी परिसरात स्थानिक टवाळखोर आणि मद्यपींच्या टोळक्यांनी आता आपला मोर्चा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकांकडे वळवला आहे. सामान्य नागरिकांनंतर (Citizen) आता थेट गॅस वितरणाची वाहने आणि कामगारांना लक्ष्य करून त्यांच्याकडे हप्त्याची मागणी केली जात आहे. आम्रपाली झोपडपट्टी परिसरात अशाच एका घटनेत हप्ता न दिल्याने सात जणांच्या टोळक्याने गॅस वितरकाला दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सिलिंडर पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

या प्रकारामुळे उपनगर परिसरात गॅस वितरण करणे जिकिरीचे बनले असून कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी फिर्यादी रहेमान अस्लम शेख (वय २६, रा. आम्रपाली नगर, गोसावी नगरसमोर, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेख हे एचपी गॅस सिलिंडर डिलिव्हरीचे काम करतात. शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते कॅनॉल रोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात (Area) वाहनातून गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी गेले होते.

​यावेळी तेथे संशयित प्रवीण काळे ऊर्फ चाफ्या, आर्यन उमाप, दर्शन पानपाटील, साहिल कनकुटे, विवेक टोनके ऊर्फ दाद्या आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार (सर्व रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड) यांनी शेख यांची गाडी अडवली. टोळक्यातील आर्यन उमाप याने शेख यांच्या गाडीतील गॅस सिलिंडर जबरदस्तीने काढून घेतला. शेख यांनी याला विरोध केला असता, प्रवीण काळे याने तुला सांगितले होते ना आम्हाला हप्ता द्यायचा, तुला कळाले नाही का?, असे म्हणत दांडक्याने व चापटीने मारहाण सुरू केली.  

​शेख यांनी मला मारू नका, अशी विनंती करूनही प्रवीण काळे, आर्यन उमाप आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत शेख यांच्या डाव्या खांद्यावर व पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. यापुढे आम्हाला हप्ता दिला नाही तर तुझ्याकडे पाहून घेऊ, अशी धमकी देत टोळक्याने गाडीतील सुमारे ३ हजार रुपये किमतीचा गॅस सिलिंडर पळवून नेला. 

​सात जणांवर दरोड्याचा गुन्हा

या घटनेनंतर जखमी अवस्थेतील रहेमान शेख यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या परवानगीने पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) (दरोडा), ३०८(३) (खंडणी), ११८ (१), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले असून उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत. 

गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती

उपनगर व नाशिक रोडच्या झोपडपट्टी भागांत टवाळखोरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कामगारांनाच रस्त्यात अडवून लुटले जात असल्याने व त्यांच्याकडे हप्त्याची मागणी होत असल्याने वितरकांनी या भागात जाण्यास धसका घेतला आहे. पोलिसांनी टोळक्यांचा बंदोबस्त न केल्यास परिसरातील सामान्य नागरिकांचा गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची भीती हाेत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : अंडरट्रायलचा भार फक्त ५ न्यायालयांवर! जिल्ह्यातील तब्बल...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये (Court) प्रलंबित खटल्यांमधील कच्च्या कैद्यांची (अंडरट्रायल) आकडेवारी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या  अंडरट्रायल अहवालानुसार, नाशिक...