Sunday, September 27, 2026
Homeदेश विदेशबिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

दिल्ली। Delhi

पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध ‘अशोक धाम’ मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक करण्यासाठी जमलेल्या सुमारे ५० हजार भाविकांच्या अथांग गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या भीषण अपघातात सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन आणि जलाभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच अशोक धाम मंदिर परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्थानकावर एकापाठोपाठ दोन गाड्या आल्यामुळे अचानक हजारो भाविकांचा ताफा मंदिराच्या दिशेने धावला. मंदिर आवारात भाविक अत्यंत शिस्तबद्धतेने रांगेत उभे असतानाच, गर्दीच्या अतिप्रचंड दबावामुळे अचानक सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स कोसळले. बॅरिकेड्स तुटताच रांगेतील लोक एकमेकांवर पडले आणि एकच गदारोळ उडाला. गर्दीच्या प्रचंड दबावामुळे आणि त्यातच सकाळच्या वेळी वाढलेल्या उकाड्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आणि अनेक भाविक एकमेकांच्या पायाखाली तुडवले गेले.

घटनेची माहिती मिळताच लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) शिवम कुमार प्रशासकीय आणि पोलीस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, “मंदिरातील अतिगर्दी, दोन गाड्यांमधून एकाच वेळी आलेले भाविक आणि वाढत्या उष्णतेमुळे ही दुर्दैवी घटना घडली. प्रशासनाकडून जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. “लखीसरायमधील अशोक धाम येथील दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या अपघातात भाविकांनी प्राण गमावल्याचे वृत्त हृदयद्रावक आहे. ईश्वर मृत आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींवर योग्य आणि त्वरित मोफत उपचार करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सध्या अशोक धाम मंदिर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...