अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरी करणार्या श्रीरामपूर तालुक्यातील चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 12 दुचाकी, पाच मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण तीन लाख 53 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. महेश कांदळकर (24), अजय कांदळकर (22), जावेद बेग (18) व विकास जाधव (19, सर्व रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांनी मढी यात्रेसह जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली आहे. 8 मार्च 2026 रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास तिसगाव रस्त्यावरील रेणुकाईवाडी येथे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.

याप्रकरणी दुचाकी मालक दत्तात्रय भागवत म्हस्के (वय 28, रा. रेणुकाईवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. 12 एप्रिल रोजी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरात सापळा रचण्यात आला.
अशोकनगर-मातापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली चार संशयितांना दोन दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत या संशयित आरोपींनी मढी यात्रेसह पाथर्डी, देहरे टोलनाका, तसेच संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर या भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी एका ठिकाणी लपवून ठेवल्याचेही सांगितले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून विविध कंपनीच्या 12 दुचाकींसह इतर साहित्य जप्त केले आहे.




