मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. भाजपने या पराभवासाठी मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे बोट दाखवले आहे. पुण्यातील एका जागेसाठी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीची मते विभागली गेली, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात प्रचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्या पोस्टमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीला सार्वजनिक व्यासपीठ मिळाले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीला ‘विजय आपलाच’ असे ठासून सांगणारी महायुती बुधवारी संध्याकाळी आत्मचिंतनाच्या मोडमध्ये गेली. विधान परिषदेच्या तीन जागा गमावल्यानंतर सत्ताधारी भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं सुरू झाली आहे. भाजपने थेटपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले आहे.
शिवसेनेवर फोडले खापर
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला. “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला, त्याचाही फटका बसला.” असे म्हणत टीका केली.
भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षांचा घराचा आहेर
विधान परिषदेच्या निकालावरून भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महायुतीला घराचा आहेर दिला आहे. “पाच जागांच्या निकालानंतर तरी महायुती म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोनवर का थांबलो? याचा विचार करणार आहोत का?” असा सवाल त्यांनी पक्षाला केला आहे.
भाजपच्या टीकेवर धंगेकरांचा पलटवार
लोकशाहीत निकाल लागल्यानंतर जनतेचा कौल मान्य करावा लागतो, अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांनी भाजपचा हल्ला परतवून लावला आहे. तसेच मतदारांमध्ये सरकारविषयी नाराजी दिसते. सरकारच्या कामकाजाबाबत जेव्हा संशय उपस्थित होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. त्यामुळे भाजपने शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचं आहे, असे सांगत नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा शिंदेंकडे दिली पाहिजे, असे मोठे वक्तव्य रविंद्र धंगेकर यांनी केले.




