मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले असून, राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे चित्र समोर आले आहे. तब्बल ४० ते ४५ तासांपर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीने तीन जागा, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. या निकालामुळे नागपूरच्या राजकीय लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले गेले.
या निवडणुकीत पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर या तीनही पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक विजयी झाले. त्यामुळे पाच जागांच्या निकालात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तीन विरुद्ध दोन असे चित्र स्पष्ट झाले.
संपादकीय : २९ ऑक्टोबर २०२६ – निसर्गाच्या मुळावर उठणारा विकास नको!
नागपूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे मंगळवारी काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर होते. परंतु, बुधवारी पहाटेपर्यंत मतमोजणीची दुसरी फेरी झाल्यानंतर भाजपच्या सुधाकर कोहळे यांनी तब्बल चार हजार मतांची आघाडी घेतली होती. ते बराच काळ ही आघाडी टिकवून होते. मात्र, बुधवारी संध्याकाळनंतर हे चित्र अचानक पालटले आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर अभिजीत वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांना मागे टाकले. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक 75, 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1, 65, 906 मतांपैकी 15,032 मते अवैध ठरली. तर 1, 50, 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या आणि द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67, 231 मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.
पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख – जाधव यांनी विजय मिळवला. बराचकाळ झालेल्या मतमोजणीनंतर 44 व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत त्यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा 9,928 मतांनी पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना अखेर 1,13, 840 मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना 1,03, 912 मतांवर समाधान मानावे लागले.
मराठवाड्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. तीनदा आमदार राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांना 60,878 मते मिळाली. तेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 74,043 मते मिळाली.
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभव स्वीकारावा लागला. किरण सरनाईक यांना १६,६६३ मते, तर अदिती पोहरे यांना ८,६३६ मते मिळाली. पसंतीक्रमाच्या मतमोजणीनंतर सरनाईक यांचा विजय निश्चित झाला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात महायुतीला मिळालेल्या दोन जागांपैकी ही एक महत्त्वाची जागा ठरली.




