अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत येथील अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव आणि राहुरी येथे तीन ठिकाणी छापे टाकून खाद्यतेल आणि मसाल्यांचा सुमारे 10 लाख रूपयांचा साठा जप्त केला. या साठ्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय असून, काही उत्पादनांवर लेबलिंगसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहे. तसेच काही साठ्याची साठवणूक अस्वच्छ परिस्थितीत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) एम. यू. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) ए. ए. भोईटे, अन्न सुरक्षा अधिकारी के. डी. जगदाळे आणि यू. आर. पाटील यांनी ही कारवाई केली. संबंधित मालाचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. कोपरगाव येथे मंगळवारी (27 ऑक्टोबर) रिनाज मसाला ड्रायफ्रूट अँड राइस सेंटर येथे तपासणी करण्यात आली. या कारवाईत ए. ए. स्पाइसेस या ब्रँडचा 52 हजार 800 रूपये किंमतीचा 88 किलो मिश्रित मसाला पावडर (सालन मसाला) जप्त करण्यात आला.
तसेच सात्विक ब्रँडची 68 हजार 400 रूपये किंमतीची 171 किलो विशेष तिखट पावडर जप्त करण्यात आली. लेबलिंगमधील त्रुटी, निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक केल्याच्या कारणांवरून ही कारवाई करण्यात आली. याच दिवशी कोपरगाव येथील लक्ष्मी किराणा स्टोअरमध्येही तपासणी करण्यात आली. तेथून व्हाइट अॅपल ब्रँडचे 2 लाख 37 हजार 186 रूपये किंमतीचे 1 हजार 168 किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.
निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्याच्या कारणावरून हा साठा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 26 ऑक्टोबर रोजी राहुरी येथील आनंद ट्रेडिंग कंपनीवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी नवकार ब्रँडचे 1 लाख आठ हजार रूपये किंमतीचे 600 लिटर रिफाइंड सोयाबीन तेल, तसेच आनंद ब्रँडचे 4 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 2 हजार 100 किलो तेल आणि आणखी 93 हजार 600 रूपये किंमतीचे 468 किलो तेल जप्त करण्यात आले. तेलाचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आणि लेबलिंगमधील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.




