मुंबई । Mumbai
हातात ३,३८३ कोटींहून अधिक रुपयांचे साम्राज्य, आलिशान गाड्यांचा ताफा आणि अंगरक्षकांचा गराडा… पण, एका सकाळी हा सर्व लवाजमा बाजूला सारून महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार अचानक सर्वसामान्यांमध्ये भिकाऱ्याचा अवतार घेऊन फिरू लागला तर? ऐकून नवल वाटेल, पण मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार पराग शाह यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हा अजब आणि डोळे उघडणारा प्रयोग केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे..
नेहमीच्या पांढऱ्याशुभ्र पोशाखात दिसणारे पराग शाह यांनी चेहरा आणि कपडे पूर्णपणे बदलून स्वतःची ओळख लपवली. आपल्याच मतदारसंघातील रस्त्यांवर ते एका सामान्य भिकाऱ्यासारखे वावरले. या प्रयोगामागचे कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या जैन आध्यात्मिक गुरूंनी त्यांना पद, पैसा आणि मान-सन्मान बाजूला ठेवून एक दिवस सामान्य भिकाऱ्याचे जीवन जगण्याचा सल्ला दिला होता. समाजाचा पैसा आणि प्रतिष्ठेविना एखाद्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
आमदार म्हणून ज्या पराग शाह यांना भेटण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात, त्याच शाह यांना भिकाऱ्याच्या रूपात पाहून बहुतेकांनी ओळखलेच नाही. काहींनी त्यांना दूर जाण्यास सांगितले, तर काहींनी त्यांच्या हातात किरकोळ पैसे टेकवले. मात्र, या सर्व अनुभवात एका समोसेवाल्याने दाखवलेली माणुसकी त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. त्या समोसेवाल्याने एकही रुपया न घेता या ‘भिकाऱ्याला’ गरम समोसा खायला दिला. “पद आणि पैशापेक्षा माणसातील माणुसकी मोठी असते,” याची जाणीव या प्रयोगातून झाल्याचे शाह यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पराग शाह यांनी ३,३८३.०६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती जाहीर करणाऱ्या उमेदवारांपैकी एक ठरले होते. २०१९ मध्ये त्यांनी ५५०.६२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. संपत्तीच्या आकडेवारीमुळेही त्यांचे नाव चर्चेत आले होते.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पराग शाह यांच्या या ‘अनोख्या प्रयोगाचे’ सोशल मीडियावर काहींकडून कौतुक होत आहे, तर काही जण याकडे एक सामाजिक आणि आध्यात्मिक अनुभव म्हणून पाहत आहेत.




