मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच सर्व पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही काँग्रेसने एक भूमिका घेतली असल्याची माहिती मिळत आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र म्हणून न लढता आपण स्वबळावर लढू. ठाकरे बंधुंशी युती केल्यास फक्त त्यांना फायदा होईल, काँग्रेसला त्याचा तोटा होतो, असे मत मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी एकमुखाने मांडले आहे. मुंबईत आज झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचा हाच एक सूर होता.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि ज्योती गायकवाड हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसाठीच्या रणनीतीवर चर्चा होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत काँग्रेसने एकला चलो रे ची भुमिका घेतल्याचा सूर आवळला आहे. या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीला नकार देताना दुसरीकडे आता काँग्रेसकडून आता उद्धव ठाकरे यांचीदेखील साथ सोडणार असल्याचे संकेत येऊ लागले आहेत.
मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वच काँग्रेस नेत्यांनी बीएमसी निवडणुकीसाठी एकला चलो रे ची भुमिका मांडली आहे. सर्व नेत्यांकडून मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी करण्यात आली. तसेच काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत ‘नो कॉम्प्रोमाईज’ धोरण अवलंबल्याची माहिती आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु असली तरी त्यासाठी महाराष्ट्रातील नेते फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
ठाकरेंमुळे अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसपासून दूर जात असल्याची चिंता व्यक्त
बैठकीदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत काही नेत्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा फायदा शिवसेना (उद्धव ठाकरे गटाला) झाला, पण काँग्रेसला त्याचा फायदा मिळाला नाही. त्याशिवाय, ठाकरेंमुळे अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याची चिंताही बैठकीत व्यक्त झाली. महाविकास आघाडीच्या समीकरणात शिवसेनेला सर्वाधिक फायदा होत असताना काँग्रेसची ताकद कमी होत असल्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत नसावी. काँग्रेसने पूर्ण ताकदीने जोर लावून लढावे, असे काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सत्ताबदल, शिवसेनेतील फूट आणि विरोधी आघाड्यांमधील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईतील संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत स्वबळावरील भूमिकेवर अधिक जोर दिला. मनसे किंवा शिवसेनेसोबत आघाडी केल्यास काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, असा मुद्दा मांडण्यात आल्याचे समजत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





