नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघ्या काही तासांवर आले आहे.त्यामुळे पडद्यामागची राजकीय समीकरणे अधिकच गडद होत आहेत. उमेदवारांची धावपळ शिगेला पोहोचली असून, मतदार असलेल्या नगरसेवकांची ‘काळजी’ घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसली आहे. रिसॉर्टवर एकत्र आलेल्या नगरसेवकांची मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) व उदय सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली.
आज (बुधवारी) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व सुनेत्रा पवार संवाद साधणार आहेत. महायुतीच्या नगरसेवक मतदारांबरोबरच महाविकास आघाडी, अपक्ष व इतर पक्षाचे नगरसेवक मतदारही ‘लक्ष्मी दर्शन केव्हा आणि किती होणार?’ याच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये मंगळवारी (दि.१६) दिवसभर होती.
हे देखील वाचा : Rajabhau Waje : “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम, पक्ष आणि नेतृत्वांशी फारकत…”; ठाकरे सेनेचे खासदार वाजेंची प्रतिक्रिया
‘लक्ष्मी दर्शन’ची चर्चा जोरात
मतदान दोन दिवसांवर येताच नाशिकच्या राजकीय वर्तुळात ‘लक्ष्मी दर्शन’ या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. पक्षनिष्ठा, विचारधारा या गोष्टी बाजूला पडून आता थेट आकड्यांची भाषा बोलली जात आहे. प्रत्येक नगरसेवकाचे मत महत्त्वाचे असल्याने ‘वजन’ देऊन मते वळवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची कुजबुज आहे. उमेदवाराकडून किती ‘दर्शन’ होणार, याचीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अजूनही नाशकात
मतदानाच्या दिवशी कोणताही धोका नको म्हणून महायुतीने आपापल्या नगरसेवकांना मुंबईत ‘सुरक्षित स्थळी’ हलवले आहे.असे असले तरी आतून मात्र ‘फोडाफोडी’ टाळण्यासाठीचा बंदोबस्त आहे. दिवसभर बैठका, भेटीगाठी असा या सहलीचा दिनक्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजूनही नगरसेवकांच्या कँपमध्ये दाखल झाले नसून नाशकातच आहेत. ते बुधवारी (दि.१७) सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.
हे देखील वाचा : Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
पक्षीय बंडखोरीची भीती
या निवडणुकीत खरी डोकेदुखी ठरतेय ती अंतर्गत बंडखोरी. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले गट आणि वर्षानुवर्षे निधी न मिळाल्याने दुखावलेले नगरसेवक कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेतील? याचा नेम नाही. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकावर ‘वॉच’ ठेवला जात आहे. एक-एक मत महागात पडू शकते, याची जाणीव महायुतीला विशेषतः शिवसेनेला व त्यांच्या नेतृत्वाला आहे.
दोन दिवस, आणि अनेक शक्यता
नाशिकच्या राजकारणात ४८ तास खूप मोठे असतात. आज जो उमेदवार आघाडीवर दिसतो, तो उद्या चित्रातही नसेल. ‘लक्ष्मी दर्शन’ किती प्रभावी ठरते आणि ‘सहली’वरून परतणारे नगरसेवक कोणाला पसंतीक्रम देणार यावर पुढील सहा वर्षांचे गणित अवलंबून आहे. सध्या तरी नाशिकमध्ये प्रचार बंद झाला असला, तरी पडद्यामागच्या ‘व्यवस्थापनाच्या फेऱ्या’ जोरात सुरू आहेत. मतदान होईपर्यंत श्वास रोखून धरण्याशिवाय पक्षश्रेष्ठींकडे पर्याय नाही. कारण इथे लढाई विचारांची कमी आणि ‘व्यवस्थापना’ची जास्त आहे.
हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले
गुरुवारीच होणार नगरसेवक दाखल
मुंबईत असलेले महायुतीचे सर्व नगरसेवक गुरुवारी (दि.१८) मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.सकाळी १०-११ वाजेच्या दरम्यान हे सर्व नगरसेवक आपआपल्या मतदान केंद्रावर हजर होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.




