नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये १७ जून २०२६ रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये (Dam) २३.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता, तर यंदा तो २३.१९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात (Gangapur Dam) सध्या १८७३ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) उपयुक्त पाणीसाठा असून, तो ३८.२३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा २५५१ एमसीएफटी (४३.२१ टक्के) होता. गंगापूर धरणात ३३.२७ टक्के, काश्यपीमध्ये ३०.०८ टक्के, तर गौतमी-गोदावरी धरणात ७५.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.मात्र जिल्ह्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये साठा चिंताजनक स्थितीत आहे.
दारणा धरणात (Darna Dam) केवळ ९.६७ टक्के, चणकापूरमध्ये ३१.२७ टक्के, गिरणा धरणात २९.८७ टक्के, तर वाघाडमध्ये अवघा १.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरणात २७.२३ टक्के, करंजवणमध्ये १६.४८ टक्के आणि मुकणे धरणात २२.९६ टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व २६ मोठ्या व मध्यम प्रकल्पांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत सारखीच दिसून येत आहे. संपूर्ण २३ धरण समूहातील एकूण उपयुक्त साठवण क्षमता ७०,६१९ एमसीएफटी असून सध्या त्यात १६,३७९ एमसीएफटी पाणी उपलब्ध आहे. ही टक्केवारी २३.१९ टक्के इतकी आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा १६,८३४ एमसीएफटी (२३.८४ टक्के) होता.
तज्ज्ञांच्या मते, यंदाचा पावसाळा लांबच चालला असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस (Rain) झाला नाही तर पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जल संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रशासनाकडूनही पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून, नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळल्यास संभाव्य संकटाची तीव्रता कमी होऊ शकते.




