Monday, April 6, 2026
Homeक्राईमCrime News : दागिन्यांच्या हव्यासापोटी युवतींच्या टोळींकडून निर्घृण खून!

Crime News : दागिन्यांच्या हव्यासापोटी युवतींच्या टोळींकडून निर्घृण खून!

बोल्हेगावातील महिलेच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव परिसरात दागिन्यांच्या लालसेतून 40 वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत लावला आहे. विशेष म्हणजे हा खून कोण्या सराईत गुन्हेगारांनी नव्हे, तर चार युवतींच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (12 डिसेंबर) बोल्हेगाव येथील कौस्तुभ कॉलनीत राहणार्‍या मनिषा बाळासाहेब शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील हालचाली, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयत महिलेच्या शेजारी माहेर असलेल्या दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय 20) हिनेच या खुनाचा कट रचल्याचे उघड झाले. तिला मयत महिलेच्या दागिन्यांची माहिती होती. त्याच माहितीच्या आधारे तिने आपल्या तीन साथीदारांना सोबत घेऊन चोरीचा डाव आखला. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, दिव्या देशमुख व तिच्या साथीदारांनी मयत महिलेच्या घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मनिषा शिंदे यांनी आरडाओरडा सुरू केल्याने आरोपींनी घाबरून तिच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून केला. या प्रकरणात दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (20), अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (22, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव, मुळ रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलींना (वय 16) ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

अधीक्षक घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी, उपनिरीक्षक दीपक मेढे व राजेंद्र वाघ, अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अतुल लोटके, अमृत आढाव, सतीष भवर, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, छाया माळी, सोनल भागवत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या