Wednesday, October 7, 2026
Homeमुख्य बातम्याVivekanand Patil : कोल्हापुरी मातीतील रांगडा आवाज, रोखठोक भाषणं अन् कष्टावर विश्वास;...

Vivekanand Patil : कोल्हापुरी मातीतील रांगडा आवाज, रोखठोक भाषणं अन् कष्टावर विश्वास; MPSC आंदोलनातून चर्चेत आलेला विवेकानंद पाटील नेमका कोण?

पुणे | Pune

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे (MPSC Student) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची काँग्रेस खासदार राहुल गांधींसह (Rahul Gandhi) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांनी दखल घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर आमदार रोहित पवार आणि विश्वजित कदम हे आंदोलनाच्या (Protest) ठिकाणी ठाण मांडून बसले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आंदोलनात आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) बरोबरीने व्यासपीठ गाजवणाऱ्या आणि या आंदोलनाचा चेहरा झालेल्या विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) याची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. त्याचे खुमासदार आणि मजेशीर शैलीतील भाषण हे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, विवेकानंद पाटील याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामीण भाषेचे ज्ञान व राजकारणाची अत्यंत सखोल माहिती असल्याने आणि कोल्हापुरी भाषेतील करारी आवाज यामुळे विवेकानंद पाटील आपल्या भाषणातून सर्वांना आकर्षित करत आहेत. त्याने या संपूर्ण आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांच्या गर्दीला (Crowd) खिळवून ठेवण्यात आणि त्यांना व्यवस्थितपणे हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे विवेकानंद पाटील नेमका कोण आहे? हे जाणून घेणार आहोत.

कोण आहे विवेकानंद पाटील?

विवेकानंद पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव या छोट्याशा गावातील रहिवासी असून,त्यांचे आई-वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.त्यांचे गावातील घर हे मातीचे व पत्र्याचे असून, अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत आणि प्रतिकूल परिस्थितीत विवेकानंद यांचे बालपण गेले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची बहीणसुद्धा एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

किती शिक्षण झाले आहे?

विवेकानंद पाटील याने कुरुंकली (जि. कोल्हापूर) येथील भोगावती महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच त्याने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. सध्या तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, आतापर्यंत त्यानी दोनदा परीक्षा दिली आहे.

वक्तृत्वावर जोरदार पकड आणि वाचनाची आवड

विवेकानंद याची वक्तृत्वावर जोरदार पकड असून, त्याला वाचनाची आवड आहे. त्याच्या गावातील साध्या घरात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये जिंकलेल्या अनेक ट्रॉफी आणि सन्मानचिन्हे मांडलेली दिसतात. बहुआयामी वाचन, कोल्हापुरी मातीतील रांगडी भाषा, अभ्यासू मांडणी, आणि भाषणात मराठी कविता व शेरोशायरीचा वापर यामुळे त्याचे विचार ऐकणाऱ्याच्या मनाला भिडतात.

MPSC आंदोलनातून मिळाली ओळख

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी परीक्षांच्या तारखांमधील गोंधळ, कृषी सेवेच्या जागांचा समावेश, पेपरफुटीविरोधात कायदे इत्यादी) झालेल्या मोठ्या आंदोलनात ते सक्रिय आहेत. ५० लाख देऊन नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत नाही. आमदार-खासदार फुटले याचं दुःख नाही, पण एमपीएससीचा पेपर फुटला तेव्हा आमचं आभाळच फुटलं किंवा आता बालवाडीचा पेपर फुटण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा त्यांच्या रोखठोक विधानांमुळे ते राज्यभरात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

घरासाठी मदत नाकारली

विवेकानंद पाटील याच्या घरच्या परिस्थितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेते व समाजसेवकांनी त्याला पक्के घर बांधून देण्याची आणि आर्थिक मदतीची ऑफर दिली. पण त्याने ही मदत नाकारली. यावेळी त्यांनी ‘२४ वर्षांचा तरुण असून,माझ्यात स्वतःच्या कष्टाने कमावण्याची धमक आहे. माझ्या परिस्थितीचे भांडवल करू नका. मला घर किंवा वैयक्तिक मदत नको, तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी आणि न्याय हवा आहे’, असे म्हटले.

ताज्या बातम्या

आंदोलन

‘आंदोलन सोडा, अभ्यासाला लागा!’ MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; सरकारला महत्त्वाचे निर्देश

0
पुणे | Puneमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या...