बोदवड – प्रतिनिधी
बोदवड शहरातील मध्य वसाहतीतील मुळ रहिवाशी परंतू दि.३१ मे रोजी जळगाव येथे उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका ७३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोनापासून दोन हात लांब असलेल्या बोदवडमध्ये अखेर करोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात करोनाने एक हजाराचा आकडा पार केलेला आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर, अश्या आजूबाजूच्या चारही तालूक्यात कोरोनाचा शिरकाव झालेला असला तरी कोरोनामुक्त तालूका म्हणून बोदवडची ओळख कायम होती. परंतू, शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामूळे खळबळ उडाली आहे.
शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात राहणाऱ्या एका ७३ वर्षीय महिलेवर जळगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. रक्तदाबाच्या त्रासावार उपचार सुरु असतांना कोरोना संदर्भात लक्षणे दिसत असल्याने कोव्हिड-१९ ची टेस्ट करत त्यांचे स्वँब घेण्यात आले होते. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. यामूळे रेणूका माता मंदिर परिसर सिल करण्यात आला आहे.
सदर कुटूंबातील नेमके किती जण संपर्कात आले आहे, त्यांच्यात काही लक्षणे दिसताय का..? याची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून जलदगतीने तपास मोहिम सुरु आहे.
नगरपंचायतीच्या वतीने रेणूका माता मंदिर परिसर सँनिटाईझ करण्यात आला असून परिसरात येणारे विविध मार्ग, गल्ल्या सिल करण्यात आल्या आहेत. (रेणूका माता मंदिराजवळील भाग (प्रभाग क्रं ६) कन्टेन्मेंट झोन जाहीर) रेणूका माता मंदिराजवळील भाग प्रभाग क्रमांक ६ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांशी समन्वय म्हणून नगरपंचायतीकडून कर्मचाऱ्यांची नियूक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून नगरपंचायतीकडून सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक राजूसिंग चव्हाण यांची नियूक्ती करण्यात आली आहे.




