नंदुरबार | प्रतिनिधी
बांधकाम ठेकेदाराने केलेल्या ४४ लाख रुपयांच्या कामाच्या मोबदल्यात ८५ हजाराची लाच स्विकारणार्या नंदुरबार येथील जि.प.च्या उपविभागीय अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत मौजे पिंपरी पाडा येथे येथे रस्त्यांवर स्लॅप ड्रेन (पुल) व नंदुरबार पंचायत समितीच्या दुरुस्तीची कामे आदी शासकीय कामाचे ठेके घेऊन त्यांनी पूर्ण केली आहेत. सर्व कामांचे एकूण बिल ४४ लाख त्यांना मिळाले आहेत.
सदर ४४ लाखाच्या कामाच्या मोबदल्यात लोकसेवक उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग नंदुरबार बबन काशिराम जगदाळे (रा.नवापूर) यांनी तक्रारदाराकडे २.५ टक्के लाच मागितली. त्याप्रमाणे हिशोब करून १ लाख ५ हजाराची लाच नक्की करून मागणी केली. पैकी २०हजार रुपये २ दिवसांपूर्वी घेतले.
उर्वरित ८५ हजार रुपये पंच व साक्षीदारांसमक्ष पंचायत समिती नंदुरबार येथे लाच स्विकारताना जगदाळे याला पकडले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस उप अधिक्षक शिरीष टी.जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल व्ही.अहिरराव, पोहेकॉ उत्तम महाजन, संजय गुमाने, पोलीस नाईक दिपक चित्ते, अमोल मराठे, संदिप नावाडेकर, मपोना ज्योती पाटील, पोना मनोज अहिरे यांच्या पथकाने केली.




