नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात काल आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.
दरम्यान, पालिकेतर्फे काल रात्री जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली असून १७ ठिकाणे सिल करण्यात आली आहेत. नंदुरबार शहरात काल एका ४८ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाला पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत ग्रीनझोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्हयात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक १० भागात हा रुग्ण आढळला आहे. सदर रुग्णाचा पोलीस विभागातर्फे सीडीआर अहवाल तपासला असता तो गुजरात राज्यातील उच्छल, तापी तसेच सुरत येथे २८ मार्च रोजी डायलिसीसच्या कामानिमित्त गेला होता.
त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटूंबातील ६ सदस्यांचे तसेच ज्या खाजगी रुग्णालयात त्याने उपचार घेतले तेथील एक डॉक्टर, पाच कर्मचारी आणि अन्य तीन जवळच्या नातेवाईकांचे स्वॅब घेवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या पार्श्वभुमीवर शहरात दि.१८ ते २० एप्रिलदरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा व औषधांची दुकाने वगळता इतर सर्व आस्थाना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
या काळात अनावश्यक बाहेर पडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिला आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत काल रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत अलीसाहब मोहल्ला, फकिर मोहल्ला, बालाजीवाडा, दखनी गल्ली, मणियार मोहल्ला, बिस्मील्ला चौक, बिफ मार्केट, रज्जाक पार्क, अमीनभैय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जुना बैल बाजार या ठिकाणी तीनदा सोडीयम, हापोक्वोराईड सोल्युशनची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. १७ ठिकाण सिल करण्यात आले आहेत. १४ ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे.




