नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८व्या BRICS शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी द्विपक्षीय भेट विशेष चर्चेत आहे. या भेटीपूर्वी चीनने भारताला मैत्री आणि ‘चांगला शेजारधर्म’ पाळण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण राहिलेल्या भारत-चीन संबंधांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार का, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
चीनचा नेमका संदेश काय?
भारतामधील चीनचे राजदूत शू फेईहॉन्ग यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची भूमिका मांडली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट तर म्हंटले, दोन्ही देशांनी दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून संबंधांकडे पाहावे, संवाद वाढवावा, सहकार्य मजबूत करावे आणि मतभेद योग्य पद्धतीने हाताळावेत, अशी चीनची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले. भारत आणि चीनने ‘मित्र आणि चांगले शेजारी’ म्हणून एकमेकांच्या यशासाठी सहकार्य करावे, असा संदेश चीनकडून देण्यात आला आहे. हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे कारण 2020 मधील गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले होते.
मोदी-जिनपिंग भेटीत कोणते मुद्दे चर्चेत येणार?
दोन्ही नेत्यांच्या बैठकीत सीमा प्रश्न, LACवरील परिस्थिती, व्यापार, गुंतवणूक, व्हिसा, आर्थिक सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध हे प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ‘स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक डायलॉग’ सुरू करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सीमेवरील प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे केवळ मैत्रीपूर्ण वक्तव्यांपेक्षा प्रत्यक्षात दोन्ही देश कोणती पावले उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
गलवाननंतर संबंध सुधारण्याचा प्रयत्न
2020 मधील गलवान संघर्षानंतर भारताने चीनविरोधात अनेक कठोर आर्थिक आणि सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ लष्करी तणाव कायम राहिला. मात्र 2024 नंतर संबंध सुधारण्याच्या दिशेने काही महत्त्वाची पावले उचलण्यात आली. सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी सहमती झाली, त्यानंतर उच्चस्तरीय राजनैतिक संवाद पुन्हा वाढला. थेट विमानसेवा आणि काही व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ववत करण्याच्या दिशेने हालचाली झाल्या. यामुळे आता मोदी-जिनपिंग भेटीत या ‘थॉ’ला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BRICSमुळे दोन्ही देशांसाठी नवी संधी
भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेली BRICS परिषद ही केवळ भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. BRICSमध्ये भारत आणि चीन हे दोन्ही प्रमुख देश आहेत. जागतिक व्यापार, बहुपक्षीय व्यवस्था, तंत्रज्ञान, ऊर्जा, हवामान बदल आणि आर्थिक सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशांना एकत्र काम करण्याची संधी आहे. मात्र BRICSच्या भविष्यातील भूमिकेबाबतही भारत आणि चीनची काही प्रमाणात वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे सहकार्य आणि स्पर्धा हे दोन्ही घटक एकाच वेळी दिसून येतात.
जगाचं लक्ष मोदी-जिनपिंग भेटीकडे
मोदी आणि जिनपिंग यांची भेट ही केवळ BRICS परिषदेतील एक द्विपक्षीय बैठक नाही. 2020 नंतर भारत-चीन संबंध कोणत्या दिशेने जाणार, याचा संकेत देणारी ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. चीनकडून ‘चांगला शेजारधर्म’, संवाद आणि सहकार्याचा संदेश दिला जात असला तरी भारतासाठी सीमा सुरक्षा, व्यापारातील असमतोल आणि चीनची पाकिस्तानसोबतची जवळीक हे प्रश्न अद्याप महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे आता प्रश्न एकच—चीनच्या ‘शेजारधर्मा’च्या संदेशाला भारताचा प्रतिसाद काय असणार आणि मोदी-जिनपिंग भेटीत प्रत्यक्षात कोणते निर्णय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.




