मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना कधी उधाण येईल याचा नेम उरलेला नाही. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बारामती दौऱ्यावर येत असल्याने राजकीय वर्तुळात नवा भूकंप झाला आहे. मोदी आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना राजकीय चिमटा काढला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांचे जुने मित्र आहेत,” असा खोचक टोला लगावताना राऊत यांनी मोदींच्या या दौऱ्यावर जोरदार भाष्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याबाबतचा प्रश्न शरद पवारांनाच विचारला पाहिजे. पण हा मोदींच्या सत्तेतील शेवटचा काळ आहे. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत मोदी देशाच्या सत्तेत असतील की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळेच कदाचित ते बारामतीत येऊन आपल्या जुन्या मित्रांना भेटत आहेत.” मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.
पुण्यात पार पडलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिंदे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर गेले असता विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. या घटनेचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “विद्यार्थ्यांनी ओमराजेंना केवळ हटकले नाही, तर थेट झटकले. शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांना आता जनतेच्या अपमानाला सामोरे जावे लागत आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला पाच-पन्नास कोटी आणि पोलिसांची सुरक्षा देऊ शकतात, पण गमावलेली प्रतिष्ठा परत आणून देऊ शकत नाहीत.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेताना राऊत म्हणाले की, “राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, नागरिक अडचणीत आहेत आणि भ्रष्टाचाराचा डोंगर वाढला आहे. अशा वेळी विधान परिषदेच्या एका जागेसाठी राज्यकर्ते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या लॉनवर बसत आहेत. शिंदे हे दिल्लीत अमित शाहांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत आहेत का?” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देणार असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.




