Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : १६० कोटींची 'मास्तर'की! शालार्थ आयडी घोटाळ्यातील २९ जणांची...

Shalarth ID Scam : १६० कोटींची ‘मास्तर’की! शालार्थ आयडी घोटाळ्यातील २९ जणांची न्यायालयात धाव; याचिकांचा पाऊस

नाशिक | Nashik

राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्याने या घोटाळ्यातील इतर बड्या संशयितांचे धाबे दणाणले आहेत. अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी तब्बल २९ संशयित सध्या अटकपूर्व जामीन आणि संरक्षणासाठी उच्च न्यायालयापासून (High Court) ते स्थानिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत.

- Advertisement -

​विशेष पथकाने (एसआयटी) आतापर्यंत तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार व प्रशांत वाडिले यांना गजाआड केले हाेते. त्यापाठोपाठ हिंगोणेकर याच्या अटकेमुळे उर्वरित संशयितांत अस्वस्थता आहे. मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात तब्बल १ हजार १९९ संशयित निष्पन्न झाले आहेत. या विशाल जाळ्यात अडकलेल्या संशयितांपैकी १२ जणांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआरमधून नाव वगळणे आणि फिर्यादच रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. तर, उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये संशयित तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याचाही समावेश आहे.

हे देखील वाचा : Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप पदाधिकाऱ्याला अटक; नाशिकच्या विशेष तपास पथकाची कारवाई

तर तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव याने अटकेपासून (Arrested) संरक्षणासाठी अर्ज केला आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून या अर्जांवर सुनावणी झालेली नाही. न्यायालयानेही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवण्याचे संकेत दिल्याने संशयितांची कोंडी झाली आहे. संशयित भाऊसाहेब चव्हाण हा नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) शालार्थ घोटाळ्याबाबत दाखल एका गुन्ह्यात सुरुवातीला स्वतः फिर्यादी होता. मात्र, एसआयटीच्या तपासात तोच या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे समोर आले. सध्या चव्हाण आणि नितीन बच्छाव दोघेही पसार असून, पोलिस त्यांच्या शोधात आहेत. दोन्ही गुन्ह्यांत निष्पन्न होऊनही चव्हाण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

​जळगावला सर्वाधिक बनावट आयडी

​नाशिक विभागात एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शालार्थ आयडी’ बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यातील तब्बल ६३८ आयडी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. यामुळेच जळगावशी संबंधित तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी त्याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे संकलित केले आहेत.

ताज्या बातम्या

क्रूरपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या चौघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) शहरात जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे बाबुजी आव्हाड विद्यालय परिसरात...