अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या पाइपलाइन रोड परिसरातील घरफोडीचा छडा लावण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हिंगोली येथील अजय भुक्तर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे चार तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन लगडी, असा एकूण तीन लाख 80 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपीने माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या घरासह तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
माजी नगरसेवक पवार (वय 55, रा. बायजाबाई सोसायटी, पाइपलाइन रोड ) यांच्या घरी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा एक लाख 57 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. विशेष म्हणजे, पवार यांच्या घराच्या पाठीमागे राहणारे अमोल झेंडे यांच्याही घरातील एक लाख 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती. अशा दोन्ही ठिकाणांहून एकूण तीन लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी बाळासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून 13 नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याशिवाय तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री रसाळ यांच्या घरातही घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी अजय महावीर भुक्तर (रा. सिद्धार्थनगर, दूध डेअरीसमोर, हिंगोली) याची ओळख पटवली.
मात्र, आरोपीचा शोध घेत असताना तो हिंगोलीतील जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्याचे ट्रान्सफर वॉरंट मिळवून त्याला अहिल्यानगर येथे आणले आणि अटक केली. पोलीस कोठडीत विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे चार तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन लगडी हस्तगत करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत तीन लाख 80 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.




