मुंबई | प्रतिनिधी Mumbai
सरकारी नोकरभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटीच्या विरोधातील कायदा अधिक कठोर करावा. संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी महत्वपूर्ण शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य सरकारला केली आहे.
सततच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागाच्या सेवा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणा सूचविण्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीने आपला दुसरा अहवाल नुकताच सरकारला सादर केला आहे.
या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांच्या गैरप्रकारांमधून झालेल्या नुकसानीची वसुली तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दल, खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचीही शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.
कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस
परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली आहे. या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
समितीच्या महत्तपूर्ण शिफारशी
संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्था : सध्याच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये ५ ते १० वर्षे कारावास, किमान १ कोटी रुपये दंड आणि परीक्षा खर्चाची वसुली अशी तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून ७ ते १० वर्षे कारावास, किमान १० कोटी रुपये दंड, व्यापक नुकसानभरपाईची वसुली आणि मालमत्ता जप्तीची शिफारस केली आहे.
अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्ती : सध्या ३ ते ५ वर्षे कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने त्यात वाढ करून ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित केला आहे.
गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्था : सध्याच्या कायद्यानुसार १ कोटी रुपयांपर्यंत दंड, परीक्षेच्या प्रमाणशीर खर्चाची वसुली आणि चार वर्षांसाठी बंदी अशी तरतूद आहे. समितीने दंडाची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, परीक्षा खर्चाची वसुली करणे आणि संबंधित संस्थेला आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
सेवा पुरवठादार संस्थांचे संचालक व व्यवस्थापन : सेवा पुरवठादार संस्थेचे संचालक, व्यवस्थापनातील व्यक्ती किंवा संस्थेचा प्रभारी अधिकारी गैरप्रकारात सहभागी असल्यास त्यांच्यासाठी ५ ते १० वर्षे कारावास आणि ५ कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. सध्या या गुन्ह्यासाठी ३ ते १० वर्षे कारावास आणि १ कोटी रुपये दंडाची तरतूद आहे.
परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे : परीक्षा गैरप्रकारांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय असल्याने अशा गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस समितीने केली आहे.
सध्या पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो. त्याऐवजी जिल्ह्यांमध्ये किमान अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात किमान पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस : विविध विभागांकडून रिक्त पदांची अनियमित माहिती मिळणे आणि परीक्षांचे वेळापत्रक निश्चित नसणे, या समस्या उमेदवारांनी समितीसमोर मांडल्या होत्या. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे.
महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा : उमेदवारांना विविध परीक्षांसाठी अर्ज करताना वारंवार प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत, यासाठी महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
परीक्षांच्या देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर : परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय ‘एक्झाम कमांड अँड कंट्रोल सेंटर’ स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे. या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रियेचे प्रभावी निरीक्षण, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि गैरप्रकार आढळल्यास तातडीने हस्तक्षेप करणे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कायमस्वरूपी परीक्षा शाखा : जिल्हास्तरावर परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक :
राज्यातील विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांनी युक्त परीक्षा केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र बँक तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा ,:
परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर होणाऱ्या भरती परीक्षांसाठी स्वतंत्र सुरक्षा योजना आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महा-सायबर आणि अन्य विशेष संस्थांच्या सल्ल्याने स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करावा. याशिवाय आयोगाने मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी नियुक्त करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.




