पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत विनानंबरच्या टाटा डंपरसह सुमारे 15 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नवनाथ रघुनाथ ढोकळे (वय 40, रा. खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 18) रोजी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलिस पथकाला गोपनीय माहिती मिळाली. देसवडे गाव परिसरातून पांढर्या रंगाच्या विनानंबरच्या टाटा डंपरमधून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित वाहनाचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोखरी गावच्या शिवारात सापळा रचला. त्यानंतर पोखरी गावात संशयित डंपर थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये वाळू आढळून आली. पोलिसांनी डंपरचालक नवनाथ ढोकळे याच्यासह वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा विनानंबरचा टाटा डंपर आणि त्यामधील अंदाजे एक ब्रास वाळू, अशी 10 हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली. एकूण 15 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. गायकवाड करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार एस. व्ही. गायकवाड, ए. जी. धामणे, के. एन. लगड तसेच पोलीस कॉन्स्टेबल जी. ए. डोंगरे, एस. बी. वाघ आणि जी. जी. जवरे यांचा समावेश होता.




