संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील बंगल्यामधून 3 लाख 7 हजार रुपयांचे दागिने नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 5 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीने अजून काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहे.
संगमनेर शहरातील मालपाणी नगर येथील रूपेश मुरलीधर भालेराव (वय 48) यांच्या सुदर्शन बंगल्यावरील 6 डिसेंबर, 2024 रोजी रात्री टेरेसचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 7 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
या पथकाने घटनास्थळी भेट देवून आसपासचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा विकास सरदारसिंग मीना (वय 30, रा. देवास, जि. देवास, राज्य मध्य प्रदेश) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने मध्य प्रदेशातील आरोपीचा पत्ता शोधून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा आदित्य कंजर (रा.रूलकी, ता.जि.शाजापूर, राज्य मध्य प्रदेश) (फरार) याच्यासह केल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही दागिने हे त्याचा मित्र नीरज मनोज छावडी (रा.रूलकी, ता.जि.शाजापूर, राज्य मध्य प्रदेश) यास स्वत:च्या पत्नीचे असल्याचे सांगून दिले व उर्वरित आदित्य कंजर याच्याकडे असल्याचे सांगितले. पथकाने आरोपीने दिलेल्या माहितीवरून नीरज छावडी याच्या राहत्या घरी जाऊन खात्री केला असता तो बाहेरगावी असल्याने त्याचे घरी गुन्ह्यातील दागिने हजर करण्याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पथकाने शनिवारी (दि.18) पंचासमक्ष नीरज छावडी याने माहिती दिली, की विकास उर्फ बंटी सरदारसिंग मीना हा माझा मित्र असून त्याने डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या पत्नीचे दागिने असल्याचे सांगून 10-15 दिवस ठेवण्यासाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच तपासात पंचासमक्ष त्याच्याकडून 5 लाख 85 हजार रुपये किंमतीचे 75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात गंठण, नेकलेस, साखळी व कर्णफुले असे जप्त करण्यात आले आहे. ताब्यातील आरोपी विकास मीना यास जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे.