राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
अज्ञात भामट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधील सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना राहुरी शहर हद्दीत 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आली होती. ही चोरी शेजारी राहणार्या दाम्पत्याने केल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली. वसीम वाजीदअली मन्सुरी, (रा. मुलनमाथा, राहुरी) यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे मनीमंगळसुत्र, 30 ग्रॅम वजनाच्या चांदीचे पायातील पैंजण व तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती.
दाखल गुन्ह्याबाबत शेजारच्याच दाम्पत्याने ही चोरी केलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक यांना खबर्या कडून मिळाल्याने सदर गोपनीय माहितीच्या आधारे तर्क काढून संशयित इम्रान निसार शेख (वय 30) व त्याची पत्नी आयशा कासम शेख (वय 31) रा.- मुलनमाथा यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना 4 डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीच्या कालावधीमध्ये चोरीस गेलेला 64 हजार रुपये किमतीचा सोने-चांदीचे दागिने असलेला मुद्देमाल राहुरी व यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणांवरून हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हाचा तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करीत आहेत.
सदरची कारवाई पो.नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हवालदार संदीप ठाणगे, विजय नवले, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे, नदीम शेख, महिला पोलिस कॉन्स्टेबल वृषाली कुसळकर यांनी केली.