अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडीच्या दसरेनगर परिसरातील शिववसुधा रेसिडेन्सीमधील एका नोकरदाराचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, दोन हजारांची रोकड असा 53 हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी गणेश सुधाकर मंचरकर (वय 42) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश त्यांच्या कुटुंबासह शिववसुधा रेसिडेन्सी, दसरेनगर, सावेडी येथील फ्लॅटमध्ये राहतात. ते दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, अहिल्यानगर येथे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी 10 वाजता ड्युटीवर गेले होते. दुपारी त्यांच्या पत्नी तृप्ती चौथ्या मजल्यावरील शेख यांच्या घरी गेल्या होत्या. त्या सायंकाळी 5.15 वाजता घरी परतल्या. घरी आल्यावर दरवाजाचा लॉक तुटलेला दिसला.
घरात प्रवेश करताच, बेडरूममधील कपाट उघडलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. गणेश घरी परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. यात त्यांना सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मिनीगंठण, सोन्याची अंगठी, कानातील लटकन, दोन हजारांची रोकड असा 53 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली व फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू केला आहे.