सिन्नर | वार्ताहर | Sinnar
नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांची न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (United Nations) मुख्यालयात भारताच प्रतिनिधित्व भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) करणाऱ्या खासदारांमधून केवळ खा. वाजे यांची एकट्याचीच निवड झाल्याने सिन्नर व नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयॉर्क (New York) येथील मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून खासदार वाजे सहभागी होणार आहेत. या माध्यमातून भारताची भूमिका, भारतीय संसदीय लोकशाही आणि देशासमोरील विविध विषयांबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संवाद साधण्याची संधी त्यांना मिळणार आहे. देशाच्या संसदीय व्यवस्थेतून थेट संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्याचा हा बहुमान नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) प्रथमच मिळाला आहे.
या प्रतिनिधी मंडळासाठी देशभरातून १७ खासदारांची (MP) निवड करण्यात आली असून त्यात १२ लोकसभा आणि ५ राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. संसदीय कामकाजातील सहभागाची नोंद पाहता खा. वाजे यांनी लोकसभेत नाशिकच्या (Nashik) विविध प्रश्नांवर भूमिका मांडली आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय राजकारणात आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने हा सिन्नरकरांसाठी (Sinnar) अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
अल्पावधीत पासपोर्टची पूर्तता..
खा. वाजे यांच्याकडे यापूर्वी पासपोर्ट नव्हता. लोकसभा सदस्य म्हणून मिळालेल्या प्रक्रियात्मक सुविधेमुळे अवघ्या चार दिवसांत त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट काढण्यात आला. त्यामुळे दौऱ्याची तयारीही वेगाने पूर्ण करण्यात आली. शुक्रवारी (दि.२) सायंकाळी ते न्यूयॉर्कला रवाना झाले असून शनिवारी (दि.३) ते न्यूयॉर्कला पोहचतील. मिळालेली ही संधी नाशिककरांच्या विश्वासाला समर्पित आहे. या अनुभवांचा अभ्यास करून त्याचा उपयोग नाशिक आणि देशाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खा. वाजे यांनी सांगितले.




