Wednesday, May 20, 2026
HomeनगरPathardi : घरफोडून रायफल, 40 जिवंत काडतूस लंपास

Pathardi : घरफोडून रायफल, 40 जिवंत काडतूस लंपास

शिक्षक कॉलनीतील घटना || पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरा लगत असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरात बंद घर फोडून माजी सैनिकाच्या नावावरील डबल बोर रायफल, जिवंत काडतुसे, चिल्लर रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून बारकाईने तपास केला जात आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जगन्नाथ शिरसाठ (वय 27, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिरसाठ हे शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे ये-जा करीत असून त्यांच्या आई शेतीच्या कामानिमित्त टेंभुर्णी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जात असतात. फिर्यादीनुसार अक्षय शिरसाठ यांनी दि. 10 मे रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून अहिल्यानगर येथे गेले होते. त्यानंतर दि. 17 मे रोजी रात्री साडेदहा वाजता घरी परत आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.

घराची पाहणी केली असता सोफ्यामध्ये ठेवलेली डबल बोर रायफल, 40 जिवंत राऊंड, चिल्लर रक्कम तसेच रायफल परवाना व इतर कागदपत्रे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत 18 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चोरीस गेलेली रायफल ही माजी सैनिक जगन्नाथ रघुनाथ शिरसाठ यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. जगन्नाथ शिरसाठ यांचे सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर संबंधित रायफल व जिवंत काडतुसे संधीत विभागाकडे जमा करण्यात आली नव्हती का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

माजी सैनिकांच्या नावावरील परवानाधारक रायफल संबंधित माजी सैनिकाच्या निधनानंतर वारसदाराने ती विनापरवाना स्वतःकडे ठेवू नये. कायद्यानुसार ती तात्पुरती अधिकृत ठिकाणी जमा करणे आवश्यक असते. जर वारसदाराला रायफल स्वतःच्या नावावर घ्यायची असेल, तर नवीन किंवा हस्तांतरण परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. मंजुरी मिळेपर्यंत शस्त्र पोलीसांकडे किंवा अधिकृत शस्त्रागारात ठेवावे लागते. पाथर्डी पोलीस या घटनेचा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...