अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बांधकाम साहित्यांची विक्री करणारे दुकान व दोन घरे फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कमेसह सुमारे पावणे चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच दोन ठिकाणी घर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. भिंगार कॅम्प, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, एकाचवेळी घरफोडीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात अज्ञात चोरट्याने शिरकाव करून सुमारे दोन लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनीषा सुरेंद्रसिंग कैडा (वय 29, रा. जोरावर लाईन, डीएमआर, ता. नगर, मूळ रा. उत्तराखंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) सायंकाळी 5:40 ते 7:20 दरम्यान ही घटना घडली आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या घरातून 60 ग्रॅमचे काळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमचे काळ्या व सोन्याच्या मण्यांचे डोरले, 18 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले, 1.5 ग्रॅमचे ओम नावाचे सोन्याचे पेंडंट व 10 हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 81 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.
विद्या टॉवर, जाधव पेट्रोल पंपामागे, कल्याण रस्ता येथील एका शिक्षकाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने व रोकड असा 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिक्षक शेखर भास्कर उंडे (वय 46) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादीच्या घरातून एक व दोन ग्रॅमचे दोन सोन्याचे कॉईन, दोन ग्रॅमचे सोन्याचे दोन कर्णफुले, 10 ग्रॅमचे सोन्याचे इतर दागिने व चांदीचे काही दागिने चोरीला गेले. तसेच फिर्यादीच्या शेजारी राहणारे किरण भाऊसाहेब कानडे यांच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. रामदास जगन्नाथ आचार्य यांच्या घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पालवे करत आहेत.
अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील पद्मावती टी पॉईंट चौक येथील बांधकाम साहित्याचे दुकान फोडून 40 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी सुशील सुनील कुकरेजा (वय 21 रा. नवलाणी ग्राऊंड, तारकपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी फिर्यादीच्या दुकानाचा पत्रा उचकटून रोकड चोरी केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक जाधव करत आहेत.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
चोरट्यांनी मागील महिन्यात मंगलगेट, बालिकाश्रम रस्ता, तपोवन रस्ता, केडगाव परिसरात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लांबविला. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच आता पुन्हा चोरट्यांनी शहरात घरफोडी करून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. काही ठिकाणी चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.