नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयमाचे माजी खजिनदार गोविंदा झा (Govind Zha) यांच्यासह पाच जणांविरोधात खंडणी, अपहरण, मारहाण आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या (Court) आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, औद्योगिक क्षेत्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील उद्योजक संतोष शिवाजी दळवी यांची अंबड एमआयडीसी येथे औद्योगिक कंपनी आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी आर्थिक गरज निर्माण झाल्याने त्यांनी मध्यस्थ अर्जुन चौधरी यांच्या माध्यमातून गोविंदा झा यांच्याशी संपर्क साधला होता. फिर्यादीनुसार ५० लाख रुपयांच्या कर्जासाठी दरमहा दोन लाख रुपये व्याज देण्याची अट ठरविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ५० लाखांऐवजी ४५ लाख रुपयेच देण्यात आले. तरीही पूर्ण रकमेप्रमाणे व्याज आकारण्यात आले.
तसेच व्यवहाराच्या वेळी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादी दळवी यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२५ मध्ये संशयितांनी काही साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मालकीच्या प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळविला. तसेच त्यांचे अपहरण करून वाहनात मारहाण (Beating) केल्याचाही आरोप केला आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दळवी यांनी घेतलेली ४५ लाख रुपयांची मूळ रक्कम आणि दोन लाख रुपये व्याज अशी एकूण ४७ लाख रुपये परत करण्याची तयारी दर्शविली होती.
मात्र संशयितांनी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी करत दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच वेळी फिर्यादीला मारहाण करून त्यांची फॉर्च्यूनर कार बळजबरीने ताब्यात घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नसल्याचा दावाही फिर्यादीने केला आहे. अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा गौरीशंकर झा (४८, रा. आदित्य व्हिला अश्विन नगर नवीन नाशिक), अर्चना झा, अर्जुन चौधरी, अन्वर चौधरी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे करत आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
फिर्यादी संतोष दळवी यांनी सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तक्रार नोंदविली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित पाच जणांविरोधात खंडणी, अपहरण, मारहाण व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.




