पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी (दि. १३) सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. नाशिकहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसच्या चाकाखाली आल्याने एका अज्ञात मोटारसायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथील गजपंथ कॉलनीसमोरील बजाज शोरूमजवळून नाशिकहून कळवणकडे जाणारी एसटी बस (एमएच १४ एमएच १४७२) जात होती. याच वेळी मोटारसायकलस्वार (एमएच १५ जेटी ९३३८) देखील त्याच दिशेने प्रवास करत होता. शोरूमजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा कट लागल्याने मोटारसायकल थेट एसटीच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की, तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरूणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, मोटारसायकलच्या क्रमांकावरून आणि जवळ असलेल्या कागदपत्रांवरून मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दिंडोरी रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
सायंकाळच्या सुमारास अपघात घडल्याने आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे दिंडोरी रोडवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी हटवत आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.




