अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महिलांना पुढे करून जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणार्या टोळीचा डाव तोफखाना पोलिसांनी उधळून लावला. डायल 112 वर आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या प्रकरणात अमोल निक्रड याच्यासह 15 महिलांना, अशा एकूण 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बहिरूनाथ मच्छिंद्र भोर (रा. भोरमळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी बुधवारी (11 नोव्हेंबर) डायल 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला. हिरा पॅलेसच्या पाठीमागे, डॉन बॉस्को शाळेजवळ 20 ते 25 महिला येऊन तोडफोड करीत असून मदतीची गरज असल्याचे त्यांनी कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भोर यांच्या घराशेजारील जागेत काही महिला तोडफोड करून बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत महिलांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संबंधित महिलांकडे जागेच्या मालकी हक्काबाबत कोणतेही वैध दस्तऐवज आढळून आले नाहीत. तसेच अमोल दिलीप निक्रड (रा. साईविहार कॉलनी, गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी अमोल निक्रडसह 15 महिलांना ताब्यात घेतले आहे. रेखा चव्हाण, रशिना चव्हाण, निस्ता काळे, भिरको भोसले, पुनम भोसले, उमा भोसले, शिल्पा काळे, सारिका काळे, करूणा भोसले, सोनाली भोसले, अश्विनी चव्हाण, सीमा काळे, काजल चव्हाण, दिपाली भोसले आणि सपना भोसले अशी त्यांची नावे आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एकशिंगे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिरसाठ, राहुल म्हस्के, सुमित गवळी, शफी शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




